कायदा कितीही कडक असला तरी त्यातून पळवाट काढणारे महाभाग असतातच. काही जण तर पोलिसांनाच चकवा देत कायद्याच्या कचाटय़ातच सापडत नाहीत. त्यामुळे कधीकझी पोलीसही हतबल होतात. मुंबईतल्या बार मालकांनी सध्या पोलिसांना चकवा देण्यासाठी अशीच एक नवीन युक्ती काढली आहे. त्यामुळे बारमधील बारबालांचे नृत्यही सुरू असते, शौकिनांचेही काम होते आणि पोलीसही हात चोळत बसतात.
राज्यात कायद्याने डान्स बार बंदी असली तरी बारमधील ऑर्केस्ट्राला परवानगी आहे. अट फक्त एका बारमध्ये जास्तीत जास्त चारच बारबाला असाव्या अशी असते. नाव जरी ऑर्केस्ट्राचे असले तरी बारबालांचे काम येणाऱ्या शौकिनांचे मनोरंजन करणे हेच असते. पण जर कायद्याप्रमाणे चारच बारबाला ठेवल्या तर बारच चालवता येत नाही. आणि जास्त बारबाला आणून लपूनछपून धंदा चालू ठेवला तर कधी ना कधी पोलिसांना त्याची माहिती मिळते आणि ते छापे घालून बारबाला, ग्राहक आणि बारच्या चालकांविरोधात कारवाई करतात. त्यामुळे पोलिसी कारवाईचा ससेमिरा चुकण्यासाठी बारमालकांनी अनोखी शक्कल लढविली आहे.
हे बारमालक नेहमीच्या ग्राहकांशी समन्वय साधून त्यांच्या आवडीच्या बारबाला ठेवतात. साधारणपणे नियमित ग्राहक विशिष्ट बारबालेचा शौकीन असतो. ठरावीक ग्राहक त्याच्या पसंतीच्या बारबालेवरच पैसे उडवतो. अशा ग्राहकांना ते बारमध्ये कधी येणार हे आधीच विचारून ते येण्याच्या वेळेलाच त्यांच्या आवडीच्या बारबाला आणल्या जातात. अशा प्रकारे ग्राहकांशी समन्वय साधून बारबाला आणण्याची वेळ ठरवली जाते. त्यामुळे पोलिसांचा छापा पडला तरी बारमध्ये एका वेळी चारच बारबाला दिसतात. छापा टाकण्यासाठी पोलीस बारमध्ये शिरले की काही सेकंदांत आवराआवर करून त्या स्टेजवर उभ्या राहतात. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागते. बारमालकांनी बारच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने पोलीस आत येत असतानाच वर्दी मिळते. पूर्वी जास्तीच्या बारबाला बारमधीलच एखाद्या गुप्त खोलीत लपवल्या जात. आता मात्र बारबाला बाहेरच लपवून ठेवल्या जातात. त्यामुळे त्यांना बारमध्ये आणणे सोपे जाते, अशी माहिती समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत समाजसेवा शाखेने लावलेले अनेक सापळे या युक्तीमुळे फसले आहेत. आम्ही बारमध्ये जातो, पण तोपर्यंत आत सारे काही आलबेल झालेले असते. बारबाला चारच असतात. ज्याला कायद्याने परवानगी आहे. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही, अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली. सीसीटीव्ही कॅमेरे फक्त पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी असतात. त्यामुळे बारमध्ये पोलिसांना कारवाई करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
अशी आहे ही शक्कल
उदा. हसमुख नावाचा ग्राहक रात्री ७ वाजता येणार असेल तर त्याच्या आवडीची बारबाला तेव्हाच बारमध्ये आणली जाते. तो ८ वाजता गेल्यावर दुसरा रमेश नावाचा ग्राहक येईल, असे नियोजन केले जाते. तो आला की त्याच्या आवडीची बारबाला येते. अशा प्रकारे एका वेळी चार बारबाला आणि त्यांचे चार ठरावीक ग्राहक असे समीकरण असते. ग्राहकांनाही पोलिसांचा त्रास नको असतो. त्यामुळे ते सुद्धा इतर बारमालकाच्या सोयीने आपल्या वेळेत तडजोड करून बारमध्ये येतात. त्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवानाही असतो. त्यामुळे छापा मारण्यासाठी आलेले पोलीस हात चोळत माघारी जातात.