जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नसल्याचा अनुभव रूग्णांना वारंवार येत असल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत अधीक्षक डॉ. रामकृष्ण कांबळे यांना हटविण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात १८ जानेवारी रोजी दोन गंभीर रूग्ण आणण्यात आले असता अपघात विभागात वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नव्हते. रुग्णांच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. या अनुभवामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हिलाल माळी, महानगर प्रमुख भूपेंद्र माळी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांह जिल्हा रुग्णालयात धाव घेत आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. रुग्णालयाच्या असहकार्य भूमिकेमागे नेमकी कोणती व्यक्ती जबाबदार आहे, त्याच्या विरुद्ध तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. संबंधितांविरुद्ध कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला होता. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदन देवून रिक्त पदे भरावीत अशी मागणीही करण्यात आली होती. रूग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आणि शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांच्या आदेशाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना शिक्षा करून रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. कांबळे यांच्यावर तातडीने कारवाई झाल्याने त्यांच्या जागी डॉ. बोरवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.