पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना शस्त्र पुरविल्याच्या आरोपावरून बंटी जहागिरदार यास मुंबई येथील दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याविरूद्ध पोलिसांनी तीनदा एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला. दोन महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी भेट घेऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी तो राजकीय दबावाखाली अद्यापही मंजूर केलेला नाही.
बंटी जहागिरदार ऊर्फ अस्लम शब्बीर शेख हा सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असूनही त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिशी घातले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दबाव आणल्यानेच त्याच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. बंटीची आई रजियाबी शब्बीर जहागिरदार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अभय मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत बंटीने राजकीय व आर्थिक क्षेत्रात ‘भरीव’ कामगिरी केली. वाळू तस्करी, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात त्याने मोठी माया कमवली. पूर्वी बंटी हा काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांचा समर्थक होता. तो आता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा समर्थक आहे. त्याला दहशतवाद विरोधी पथकाने यापूर्वीही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळे त्याची सुटका झाली. पण आता दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी हस्तक्षेपाला जुमानले नाही.
बंटी १९९७ सालापासून गुन्हेगारी कारवाया करू लागला. माजी नगरसेवक आयुब शेख याच्याशी त्याचे वैमनस्य निर्माण झाले होते. त्यातून हाणामारीचे सत्र सुरू झाले. पोलिसांनी २००२ मध्ये त्याला तडीपार केले. तो मुंबई येथे जाऊन राहिला. तेथून त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध जोडले गेले. भिवंडी तालुक्यातील पडघा येथील ग्रामपंचायत सदस्य अब्दुल सत्तार गुजर याच्या हत्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याने त्याला ऑक्टोबर २००३ मध्ये अटक करण्यात आली. सिमीचा हस्तक व गेटवे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साकीब नाचन हा मुख्य सूत्रधार होता. गुजरात मुस्लिम रिव्हेंज फोर्सचा तो सक्रिय सदस्य होता. त्याचे तारीक गुजर याच्याशी वाद होते. त्यातून साकीबने गुजरची हत्या घडवून आणली होती. भिवंडी बजरंग दलाचे अध्यक्ष ललित जैन यांच्या हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग असावा असा संशय होता. मात्र, गुजर खून प्रकरणी त्याला आरोपी करण्यात आले होते. त्यात तो निदरेष सुटला. संरक्षण दलातील गोपनीय छायाचित्रे, नकाशे व कागदपत्रे जवळ बाळगण्याप्रकरणी आरिफ हबीब लखानी व बंटी जहागिरदार यांना मनमाड पोलिसांनी २००६ मध्ये अटक केली होती. त्यांच्याकडून एक सीडी जप्त केली होती. पाक दुतावासाला ही माहिती तो पुरविणार असल्याचा दहशतवाद विरोधी पथकाचा संशय होता. नंतर त्याला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने ताब्यात घेतले होते. नेवासे येथील पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे याच्या हत्येनंतरही बंटीची चौकशी झाली होती. नेवासे दंगलीत त्यास ताब्यात घेण्यात आले होते. भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या हत्येच्या सुपारी प्रकरणात त्याचा सहभाग होता. मारामारीचेही काही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
बंटीच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणेचे नेहमीच लक्ष राहिले आहे. यापूर्वी त्याच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविले होते. कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिता ठाकरे यांनी त्याचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्याकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर शिंदे स्वत: दोनदा जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. पण त्यांनी तो मंजूर केला नव्हता. बंटी हा खतरनाक गुन्हेगार असून त्याचा देशद्रोही कारवायांशी संबंध आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी विनंती केली गेली होती. पण उपयोग झाला नाही.
बंटी याने मोठे साम्राज्य उभे केले आहे. गोदावरी नदीपात्रातून कोटय़वधी रुपयांच्या वाळूचा बेकायदे उपसा त्याने केला. महसूल खाते व पोलीस त्याच्यावर कारवाई करू शकले नाही. शहरात अनेक भूखंड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याने गुंतवणूक केली. औद्योगिक वसाहतीत त्याचा दुधाचा प्रकल्प आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ात माल विक्री व्यवसायावर त्याचे नियंत्रण आहे. गुन्हेगारांचे एक मोठे सिंडीकेट त्याने उभे केले आहे. अनेक गुन्हेगारांना सोडविण्यासाठी त्याच्याकडे मोठी यंत्रणा आहे. सरकारी अधिकाऱ्यांना रसद पुरवून त्याने आपले साम्राज्य उभे केले असून त्याला राजकीय पाठबळाचाही फायदा झाला आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी याबाबत सांगितले की, बंटी राष्ट्रवादीत नाही. वर्षांपूर्वी त्याची आई राष्ट्रवादीत आली. त्यांना पालिकेची उमेदवारी दिली. बंटी उमेदवार नव्हता असा खुलासा त्यांनी केला असला तरी बंटी हा गेल्या एक वर्षांपासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मिरवत होता. आता बंटीच्या अटकेने मुरकुटे यांची गोची झाली आहे.