शहरातील हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा उठाव करणाऱ्या ‘नेचर इन नीड’ या ठेकेदार कंपनीने कचऱ्यांची विल्हेवाट लावताना स्वच्छता, सुरक्षितता न पाळता नियम व अटीचा भंग करून महापालिकेला फसवण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे या कंपनीचा ठेका काढून घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी केली, तर शहराबाहेरील मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत दहनासाठी सेवाशुल्क आकारण्याचा प्रस्ताव धुडकावण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रतिभा नाईकनवरे होत्या.
महापालिकेची तहकूब सभा व सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये माजी महापौर कांचन कवाळे, उपमहापौर दिगंबर फराकटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख व गटनेता दिलीप भुर्के यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन विद्यमान महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विषयपत्रिकेवरील शहर हद्दीबाहेरील दहनासाठी पंचगंगा स्मशानभूमीत येणाऱ्या प्रेतासाठी सेवाशुल्क आकारण्याचा आलेला प्रस्ताव नगरसेवकांनी धुडकावून लावताना ४०० कोटींच्या महापालिकेच्या उलाढालीत असे सेवाशुल्क आकारण्याची गरज नाही असे शारंगधर देशमुख यांनी सांगून महापालिकेला त्यामुळे फार मोठा बोजा पडत नाही असे स्पष्ट केले. आरोग्याधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शहराबाहेरील बेवारस प्रेते विनामूल्य दहन केली जातात. पण इतर प्रेतासाठी हद्दीबाहेर जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून ही निधी उपलब्ध असतो असे सांगितले. तशीही माणुसकीच्या दृष्टीने महापालिकेने सुरू केलेल्या मोफत दहनाची परंपरा सुरूच ठेवावी असे सांगण्यात आले. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी याबाबत ऑडिटमध्ये अडचणी येतात हा खर्च दाखवता येत नसल्याचे सांगताना सभेला प्रस्ताव नामंजूर करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यानुसार हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
आदिल फरास यांनी शहरातील हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता प्रकल्पाच्या ठिकाणी शेड उभारले आहे. कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित कचरा न जाळता केली जाते. त्यासाठी आवश्यक तेवढे डिझेल वापरले जात नाही. िहटिंग सिस्टिम ही न वापरता केवळ चालू ठेवून महापालिकेची फसवणूक करतात. त्यामुळे हा कचरा कुजला जातो व व्यवस्थित र्निजतुक न होता उलट अधिक धोकादायक होतो. जाळताना होणाऱ्या धुराने परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या सर्व बाबी आरोग्याधिकारी विजय पाटील यांना समक्ष दाखवल्या असल्याचे सांगितले व या कंपनीवर कारवाई करावी. कंपनीला काळय़ा यादीत घालावे असे सांगितले. यावर विजय पाटील कंपनीला कारणे दाखवा नोटीस दिल्याचेही सांगितले. प्रत्यक्ष कंपनीच्या चुका दाखवून फक्त कारणे दाखवा नोटीसच का प्रत्यक्ष कारवाई का नाही, अशी विचारणा सभेत करण्यात आली. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी कंपनीवर कारवाई ही करण्यात येईल असे सांगितले.
रवि इंगवले यांनी पी.स.नं. ११०४ वरील खुल्या जागेबाबत आजी-माजी अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या आहेत. या जागेला प्रत्यक्ष भेट द्यावी. पुढील सभेत प्रश्न येणार असल्याचे सांगितले. सुभाष रामुगडे यांनी िशगणापूर पाणी योजनेची सर्व गळती काढून वाया जाणारे पाणी वाचवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
वैद्यकीय कचरा उचलणा-या कंपनीवर कारवाईची मागणी
शहरातील हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा उठाव करणाऱ्या ‘नेचर इन नीड’ या ठेकेदार कंपनीने कचऱ्यांची विल्हेवाट लावताना स्वच्छता, सुरक्षितता न पाळता नियम व अटीचा भंग करून महापालिकेला फसवण्याचा प्रयत्न केला.
First published on: 31-05-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for action on nature in need company