कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावे या मागणीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनने मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी मागणीचे निवेदन स्वीकारून शासनाकडे मागण्या कळवतो, असे आश्वासन दिले. कोल्हापुरात हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी गेली २५ वर्षे प्रयत्न सुरू आहेत. या मागणीची तीव्रता वाढवण्यासाठी खंडपीठ कृती समिती कोल्हापूरने जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे इचलकरंजी बार असोसिएशनने आज न्यायालयापासून मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
या आंदोलनात इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.जी. लोहार, सेक्रेटरी अ‍ॅड. पी.ए. उपाध्ये आणि मेट्रो हायटेक पार्कचे सुरेश पाटील, प्राचार्य ए.बी. पाटील अहमद मुजावर, दत्ता माने, सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांच्यासह सामाजिक, राजकीय, कामगार चळवळीतील नेते आणि वकील, पक्षकार नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आल्यावर वकिलांनी
कोल्हापूर येथे हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीच्या घोषणा दिल्या. या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना देण्यात आले. या शिष्टमंडळाने मागण्याबाबत प्रांताधिकारी ठोंबरे यांच्याशी चर्चा केली.