हृषीकांत शिंदे हा शशिकांत शिंदे प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पालकमंत्री तपासी यंत्रणेवर दबाव आणत आहेत. चौकशी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. साता-याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा राजीनामा मागत मनसेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दोन दिवसात राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा या वेळी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी दिला आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी मेळावा घेतला होता. परंतु जिल्ह्याचे पालकत्व गुंडांना सांभाळणा-या आणि महिलांच्या अब्रूला हात घालणा-यांकडे दिले आहे. अजित पवार यांनीही महिलांच्या सन्मानाची भाषा वापरली होती, आता ते ना. शिंदे यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. हृषीकांत शिंदे यांच्याशी संबंध तोडण्याची भाषा पालकमंत्री करत असले तरी शिंदे यांचे कॉल्स तपासावेत, तसेच या गुन्ह्यात ना. शिंदे यांचा हस्तेपरहस्ते सहभाग आहे का ते पहावे, त्यांना पोलिसात बोलावून त्यांची चौकशी करावी, दोघांच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि तपास महिला ज्येष्ठ पोलीस अधिकारी शिवशंकरन यांच्याकडे सुपूर्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. डॉ. येळगावकर हे हृषीकांत शिंदे यांचा पालकमंत्र्यांशी काय संबंध असा प्रश्न विचारतात, मग शशिकांतने स्थापन केलेल्या प्रतिष्ठानचा तो अध्यक्ष कसा काय? हे प्रतिष्ठान शिंदे यांच्या नावाने काढले आहे, त्यामुळे भावाभावांचा संबंध नाही असे सांगणे हास्यास्पद आहे, असे मनसेचे अध्यक्ष भोसले म्हणाले.