शहरात एका वितरकाच्या गोदामात छापा टाकून कार्बाईडचा वापर करून आंबे पिकविल्याबद्दल कारवाईचा देखावा अन्न व औषध प्रशासनाने केला; परंतु शहरात आजही केळी व पपई यांच्या अनेक गोदामांत अशा प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येत असून अशा सर्व गोदामांवर छापे टाकण्याची मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने एखाद्या गोदामावर छापा टाकण्यापेक्षा केळी, पपई व आंबे कार्बाईडने पिकविण्याचा संगनमताने धंदा करणाऱ्या सर्व गोदामांवर व रस्त्यावरील आंबा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही पंचायतीने केली आहे. अशा प्रकारच्या रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे खाण्यामुळे ग्राहकांना पोटाच्या विकारांसह कॅन्सरसारखे गंभीर आजारही होऊ शकतात, असे ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे, कृष्णा गडकरी, जगन्नाथ नाठे, अनिल नांदोडे यांनी लक्षात आणून दिले आहे.
दरम्यान, गंगापूर, कॉलेज रोड परिसरातील सुमारे १० हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलविण्याच्या नावाखाली मीटर रीडिंग न घेता अंदाजे अवास्तव वीज बिले देण्यात आली असून तक्रार करण्यास गेल्यावर तक्रार अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. बेकायदेशीर वीज बिले कंपनीने त्वरित रद्द करावीत व मीटर रीडिंग घेऊनच वीज बिले सुधारून द्यावीत अन्यथा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ग्राहकांनी आपली तक्रार ९४२१९१७३६४ या क्रमांकावर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.