पालिका घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही वर्षभरापासून पाठराखण केलेल्या गुलाबराव देवकर यांना अखेर मंत्रिमंडळातून नारळ देण्याचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातून त्यांच्या जागी प्रथमच आमदारकी भूषविणाऱ्या संजय सावकारे यांना संधी दिली आहे.
घरकुल घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेले देवकर पक्षासाठी डोकेदुखी ठरले होते. पक्षाने त्यांचा बचाव केला असला तरी आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ही भूमिका अडचणीची ठरेल हे लक्षात घेत देवकरांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. घरकुल घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर देवकरांनी दिलेला राजीनामा पक्षाने स्वीकारला नव्हता. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळूनही ते मंत्रिपदावर कायम राहिले. मंत्र्यांमधील फेरबदलाचे सूतोवाच झाल्यावर देवकरांची गच्छंती होणार हे उघड होते. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत. देवकरांना डच्चू दिल्यावर राष्ट्रवादीने भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना संधी दिली. तंत्रनिकेतन पदविकेचे शिक्षण घेणारे सावकारे काही वर्षांपूर्वी मुंबईत नोकरीस होते. नोकरी सोडून भुसावळला आल्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम स्वीकारले. मतदार संघाच्या पुनर्रचनेत भुसावळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. त्यावेळी पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा खुद्द संतोष चौधरींनी त्यांचे नांव पक्षश्रेष्ठींकडे सूचविले. पक्षाने सावकारे यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत सावकारेंनी शिवसेनेच्या राजेश झाल्टेंचा पराभव केला. मध्यंतरीच्या काळात संतोष चौधरींना खंडणीच्या प्रकरणात अटक झाली. चौधरी हे अटकेत असतानाच भुसावळ नगरपालिकेची निवडणूक झाली. आ. सुरेश जैन व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगरपालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी व्यूहरचना आखली. त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. संपूर्ण परिस्थिती विरोधात असताना आ. सावकारे यांनी चौधरींच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या नावावर एकखांबी तंबू लढविला. कोणताही गाजावाजा न करता या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राखली. चौधरी यांची वर्तणूक कायम वादग्रस्त राहिली आहे. अलीकडेच पालिकेतील अधिकाऱ्यांना दमबाजी केल्याचे त्यांचे प्रकरण थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेले. चौधरी अद्याप कारागृहात आहेत. या संधीचा लाभ उठवित सावकारे यांनी मतदार संघावर आपली चांगलीच छाप पाडली.