सांप्रदायिकतेचा पराभव करू अशा वल्गना गेल्या चार निवडणुकांपासून मारणाऱ्या काँग्रेस पक्षाने मला पाठिंबा देऊन त्यांना अपेक्षित असेलेले काम पूर्ण करावे, अशी कोपरखळी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चुरस वाढवणारे उमेदवार किशोर गजभिये यांनी मारली. शाहू, फुले आणि आंबेडकर पदवीधर संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या गजभिये यांनी संघटनेचा जाहीरनामा पत्रकार परिषदेत सादर केला. प्रतिस्पध्र्याकडून अफवा पसरवणे आणि लांच्छन लावण्यासारख्या प्रचाराचा खरपूस समाचार घेताना गजभिये म्हणाले, गेल्या चार निवडणुकींमध्ये सांप्रदायिक ताकदींना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रचार करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी मला पाठिंबा देऊन त्यांचे इप्सित साध्य करावे. चार वेळा पराभूत झालेले डॉ. बबन तायवाडे याही निवडणुकीत पराभूत होतील, अशी २०० टक्के खात्री असल्याचे गजभिये म्हणाले.
अपघाताने राजकारणात आलो नसून प्रयत्नपूर्वक, ठरवून राजकारणात आलो आहे. डोंगराळ, दुर्गम भागात सभा घेतल्या असून ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क निर्माण झाल्याने मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या ३० वर्षांंत १ लाख ८८ हजार मतदारांची जेमतेम नोंद झाली तर संघटनेने केलेल्या ४० दिवसांच्या प्रचारात तब्बल १ लाख ४० हजार एवढी नोंदणी झाल्याचे पत्रकार परिषदेत अधोरेखित करण्यात आले. १ फेब्रुवारी २०१४ पर्यंत २ लाख ७७ हजार मतदारांची नोंदणी झाली होती. त्यानंतर झालेल्या नोंदणीनंतर मतदारांचा आकडा तीन लाखांच्या घरात जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
आचारसंहितेच्या नावाखाली मतदार नोंदणी करताना अनेक ठिकाणी प्रशासनातील लोकांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. उलट नोंदणी जास्त संख्येने व्हावी, असाच शासनाचा आणि निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. त्यात आडकाठी आणण्याचे काम प्रशासनातील लोक कशाप्रकारे करतात, याची उदाहरणे किशोर गजभिये यांनी दिली. कोणत्याही मोठय़ा, राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ नसताना स्वबळावर निवडणूक लढत असून कोणत्याही अफवांवर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. बनारस हिंदू विद्यापीठ किंवा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाप्रमाणे एकही केंद्रीय विद्यापीठ विदर्भात नाही. तसे विद्यापीठ या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करू, राज्याच्या रोजगार निर्मितीच्या धोरण निश्चितीमध्ये पदवीधरांचा सहभाग वाढवणे, पदवीधरांच्या रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना करणे, सुशिक्षित बेरोजगारांच्या शैक्षणिक अडचणी दूर करणे, उच्च शिक्षण व विद्यापीठ प्रवेश तसेच शिष्यवृत्ती इत्यादी अडचणी सोडवणे, नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठाचा वाढता शैक्षणिक दर्जा उंचावणे, पदवीधर व पदविकाधारक गृहिणींना रोजगारासाठी प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सैन्य दलातील पदवीधर व पदविकाधारकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणे अशा एकूण २१ योजनांचा समावेश गजभिये यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केला आहे.