नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेल व धाब्यांवर नेहमीच मस्तवाल लोकांची मस्ती व गुंडागर्दी सुरू असते, पण मंगळवारी त्यात भर पडली ती न्यायाधीश महाशयाने घातलेल्या गोंधळाची! एरवी न्यायालयात लोकांना कायद्याची जाण करून देणाऱ्या या महाशयांनी मंगळवारी सायंकाळी बाभळेश्वर चौकात अरेरावी, दादागिरी असे सारे प्रकार करीत सार्वजनिक ठिकाणी स्वत:च कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणली. विशेष म्हणजे या महाशयांचे पद लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पाठीशी घालण्यातच धन्यता मानली.
मंगळवारी सायंकाळी ८च्या सुमारास खासगी वाहनाने बाभळेश्वर येथे हे न्यायाधीश महाशय आले. राज्यमार्गावरील या रहदारीच्या चौकातील एका हॉटेलच्या दारातच येण्या-जाण्यास अडचण होईल अशा पद्धतीने त्यांनी वाहन लावले. ग्राहकांना अडचण होऊ नये म्हणून या हॉटेलचालकाने अदबीनेच त्यांना मोटार बाजूस घेण्यास सांगितले. परंतु या महाशयांना ते मान्य नव्हते. मोटार काढतो, असे सांगूनही प्रत्यक्षात ते त्याला तयार नव्हते. हॉटेलचालक त्यांना ओळखत नव्हता, मात्र हॉटेलचा रस्ताच अडल्याने त्याने या महाशयांना पुन्हा मोटार काढण्याची विनंती केली, हेच या गोंधळाचे निमित्त ठरले.
मोटार बाजूला काढणे दूरच राहिले, न्यायाधीश महाशयांनी या हॉटेलचालकाला असे काही फैलावर घेतले की चौकातच हमरीतुमरी सुरू झाली. अर्थातच त्यात मोठा आवाज होता तो या न्यायाधीश महाशयांचा. या गोंधळाने येथे बघ्यांची एकच गर्दी झाली, त्यामुळे तर रहदारीलाच अडथळा आला. अखेर या महाशयांच्या सहकाऱ्याने जवळच असलेल्या लोणी पोलीस ठाण्यास घटनेची माहिती देऊन हे महाशय कोण आहेत, त्याचीही कल्पना दिली. त्यांनी बाभळेश्वर दूरक्षेत्राला कळवल्याने येथील एक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाला, त्याला पाहून या महाशयांना अधिकच स्फुरण चढले. त्यांचा दांडपट्टा सुरूच होता, त्यामुळे हॉटेलचालकही गुश्श्यातच होता. पोलिसाने त्यालाच दरडावून शांत केले, न्यायाधीश महाशयांना सन्मानाने दूरक्षेत्रात नेले, तेथे कोल्ड्रिंक देऊनच त्यांचा राग शांत झाला. तोपर्यंत  दूरक्षेत्राचे अधिकारीही येथे आले, त्यांनीही झाल्या प्रकाराची खबरबात घेत न्यायाधीश महाशयांना अभय दिले. तोपर्यंत ही व्यक्ती कोण आहे हे या हॉटेलचालकाला व बघ्यांनाही समजले होते. आता आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हॉटेलचालकाने लगेचच हॉटेल बंद करून काढता पाय घेतला, बघ्यांनीही घरची वाट धरली. एवढय़ावर हा विषय संपला, मात्र सुमारे अर्धापाऊण तास लोकांची त्यामुळे चांगलीच करमणूक झाली, शिवाय ज्यांनी कायद्याचे रक्षण करायचे तेच शांतता कशी बिघडवतात हेही ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळाले.
बाभळेश्वर चौकात असे प्रकार नेहमीच घडतात. येथील हॉटेल व्यावसायिक, अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांना, येणाऱ्या-जाणाऱ्यांना उर्मटपणेच वागवतात. तक्रार करूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, त्यात मंगळवारी भर पडली ती न्यायाधीश महाशयांच्या अरेरावीची. त्याकडेही पोलिसांनी दुर्लक्षच केले!