टोलविरोधी आंदोलनस्थळी राज्य महिला हक्क व कल्याण समितीच्या अध्यक्ष, आमदार निर्मला गावित व आंदोलक यांच्यात शनिवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून शाब्दिक वादावादी झाली. यामुळे शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलकांची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना कधी इस्पितळात तर कधी आंदोलनस्थळी राहावे लागत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण संघर्ष समितीने टोलविरोधात मोर्चा काढून आंदोलनस्थळी पाठिंबा दिला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी या प्रश्नी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. तर कृती समितीने शासनाशी चर्चा न करण्याची भूमिका घेतल्याने आंदोलन कोंडीत सापडले आहे.    
टोलविरोधात सुरू झालेल्या बेमुदत आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस होता. शुक्रवारी महापालिकेमध्ये राज्य महिला हक्क व कल्याण समितीच्या आमदार सदस्यांनी चर्चा होती. ही बैठक आवरून समितीच्या अध्यक्ष, आमदार निर्मला गावित महापालिकेतून बाहेर पडल्या. त्यांची मोटार महापालिकेसमोर सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलनाच्या मंडपासमोरून जात होती. तेव्हा काहींनी आमदार गावित व अन्य सदस्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. हे म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या टोल समर्थक कार्यकर्त्यांना आमदार गावित यांच्या स्वीय सहायकाने उद्धट भाषा वापरली. यावरून काही काळ वाद झाला. उपोषणामध्ये माजी नगरसेविका माणिक पाटील यांचा समावेश असल्याने किमान त्यांची तरी भेट आमदार गावित यांनी घ्यावी, असे सांगण्यात आल्यावर त्या आंदोलनाच्या मंचावर आल्या. त्यांनी उपोषणकर्त्यांची चौकशी केली. मात्र याच वेळी तेथे असलेल्या एका कार्यकर्त्यांने शेरेबाजी केली. त्यामुळे गावित या नाराज होऊन तेथून बाहेर पडू लागल्या. यातूनच गावित व आंदोलकांच्या शाब्दिक चकमक उडाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्याशी चर्चा करून आपला आंदोलनाला पाठिंबा असल्याचे नमूद केल्यावर या वादावर पडदा पडला.    
दरम्यान, शुक्रवारीही विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांनी आंदोलकांची भेट घेऊन टोलविरोधी लढय़ाला पाठिंबा असल्याचे सांगितले. पी. एन. पाटील व मालोजीराजे या माजी आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी याप्रश्नी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार राजीव आवळे यांनीही आंदोलनस्थळी येऊन आपली भूमिका मांडली.    मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने टोलला पािठबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे हातात घेऊन निघालेल्या मोर्चेकरांनी टोलला हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही, अशा घोषणा दिल्या. समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आंदोलनस्थळी पाठिंबादर्शक भाषण केले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव राणे, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित सावंत, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. पी. मोरे, कोल्हापूर जिल्हा पैलवान फाऊंडेशनचे सरदार सावंत, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल देशमुख यांच्यासह या सर्व संघटनांच्या सदस्यांनी टोलविरोधी लढय़ाला पाठिंबा दिला.