महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी १३,१११ रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी जाहीर केले. शुक्रवारी नव्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. विद्यमान महापौरांनी जाता जाता कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली. या निर्णयामुळे पालिकेवर सुमारे १० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. वाघ यांनी याबाबतची घोषणा केली. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दिवाळीसाठी किती बोनस मिळणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष होते. त्यांची उत्सुकता विद्यमान महापौरांनी शमविली. कायमस्वरूपी कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत सानुग्रह अनुदानाचा लाभ कंत्राटी कामगार, शिक्षण मंडळातील कर्मचारी अशा सर्वाना मिळणार आहे. स्थानिक संस्था कर लागू झाल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याची ओरड सुरू आहे.
या स्थितीत कर्मचाऱ्यांना घसघशीत अनुदान जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेत साडेचार ते पाच हजार कर्मचारी आहेत. त्यांच्यापोटी सुमारे सात कोटी, तर शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांसाठी अडीच कोटी असा सुमारे दहा कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.