दिवाळी म्हटली की, खरेदी आलीच. दादर, गिरगाव या हक्काच्या बाजारपेठांमधील ओसंडून वाहणाऱ्या गर्दीतही खरेदीची मजा औरच. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत खरेदीदारांचा ओढा ऑनलाइन शॉपिंगकडे वळलाय अन् ऑनलाइनच्या जगतातील दादा साइटस्नीही दिवाळीतील खरेदीदारांना अचूक हेरत भरघोस सवलती देऊ केल्या आहेत. अगदी २०-३० टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट उपलब्ध करून देण्याबरोबरच विश्वासार्हतेसाठी प्रत्यक्ष घरी नमुना पाठविणे ते वस्तू मिळाल्यावरच पैसे देणे वा पसंत न पडल्यास परत घेणे आदी मार्गानी या दिवाळीत आपल्या खरेदीदारांना लक्ष्य केले आहे. ‘असोसिएट चेम्बर्स ऑफ कॉमर्स अंड इंडस्ट्री’ने केलेल्या एका सर्वेक्षणनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑनलाइन शॉिपग करणाऱ्यांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ई-खरेदीला यंदा जोड मिळाली आहे ती आकर्षक ऑफर्स आणि कंपन्यांनी दिलेल्या विविध सुविधांनी. सतत धावपळीच्या आयुष्यात विविध कारणांनी अनेकांना बाजारात जाऊन खरेदी करण्यास अनेकांना वेळ मिळत नाही. यामुळे ई-खरेदीस चांगलीच मागणी वाढल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. याचबरोबर बाहेरच्या पेक्षा अधिक स्वस्त किमतीमध्ये येथे या वस्तू मिळत असतात. यामुळेही ग्राहक ई-खरेदीकडे वळत असल्याचेही सर्वेक्षणात समोर आले आहे. ऑनलाइन शॉिपगमध्ये जबाँग, मयंत्रा, फ्लिपकार्ट, गतीकनेक्ट, ई-बे, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील अशा किती तरी वेबसाइटना अधिक पसंती आहे.
ऑनलाइन शॉिपग करणाऱ्यांमध्ये ५० ते ६५ वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. अनेक तरुण मुलांनी आपल्या आई-वडिलांना ई-खरेदीचे धडे दिले असून त्यांच्यामार्फत शॉिपग करून घेत असल्याचेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. दिवाळीच्या निमित्ताने बहुतांश मंडळी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवे, डेकोरेशनचे साहित्य, सुका मेवा आणि चॉकलेट यांची खरेदी सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या खरेदीवर ५६ टक्के लोक १० हजार रुपयांपर्यंत खर्च करतात तर ३६ टक्के लोक १० हजार ते २५ हजारच्या दरम्यान खर्च करतात तर आठ टक्के लोक ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्याची तयारी दर्शवीत आहेत.