डॉक्टरांनी समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी तत्पर असावे. प्रत्येकाला कमी खर्चात आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. भ्रष्टाचाराने वैद्यकीय क्षेत्रालाही विळख्यात घेतले आहे. परंतु सेवाभावी वैद्यकीय क्षेत्र अजूनही पावित्र्य जपते, असे प्रतिपादन भारतीय वैद्यक परिषदेच्या शैक्षणिक समितीचे सदस्य डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील सभागृहात ‘डॉक्टर्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सेवाभावी डॉक्टरांचा सत्कारही डॉ. मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रदेश शाखेचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मिश्रा म्हणाले, पूर्वी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार समाज चालत असे. आता मात्र डॉक्टरांचे ऐकण्यास समाज तयार नाही. संवेदनशीलताच नष्ट झाली आहे. या गोष्टींचे चिंतन होणे गरजचे असल्याचेही ते म्हणाले.
अनेक अत्याधुनिक यंत्रणामुळे आजचा रुग्ण अधिक प्रगल्भ झाला आहे. आजाराविषयी प्रत्येक लक्षणाची आणि त्यांच्या परिणामांची जाणीव त्याला असते. डॉक्टरांपुढे हे एक आव्हान आहे. धर्माच्या आधारावर असलेल्या या क्षेत्रामुळे राष्ट्रनिर्माणाची सुदृढ कडी म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे बघितले जाते. त्यामुळे डॉक्टरांना त्यांचे आयुष्य आनंदाने घालवायचे असेल तर समाजाला देण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन डॉ. विनायक देशपांडे यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी डॉ. प्रभा बल्लाळ, डॉ. कांचन सेठ, डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. जी.के. सरोदे, डॉ. एस.डब्ल्यू. कुळकर्णी, डॉ. बी.एम. सहाय यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तीनी आपल्या भाषणातून सामाजिक बांधीलकी जोपासावी, असा सल्ला दिला.
आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संचालन डॉ. सरिता उगेमुगे आणि डॉ. दिलीप अर्जुने यांनी केले. आयएमएचे सचिव डॉ. कुश झुनझुनवाला यांनी आभार मानले. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील डॉक्टर्स व त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.