‘नेमेचि येतो पावसाळा सृष्टीचे हे कौतुक जाण बाळा’च्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी विदर्भात कुठे न कुठे पार पडलेल्या संमेलनाने यावर्षी तळोधी बाळापूरवर मोहोर उमटवली. समाजाच्या वेदना मांडणारे साहित्य असावे, असे मत संमेलनाच्या समारोपप्रसंगी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. हे सूत्र त्यांनी साहित्याच्या संदर्भात जरी मांडले असले तरी चंद्रपूर जिल्ह्य़ातील एक साहित्यप्रेमी या नात्याने आशीष देव यांच्या निरीक्षणातून बोचरे बारकावे टिपले गेले.
संमेलनाची पत्रिका अनेक मान्यवर, साहित्यिकांपर्यंत पोहोचली नव्हती. असे संमेलन विदर्भात होत आहे याची पुसटशीही कल्पना इतरांनाच काय पण विदर्भ साहित्य संघाशी संबंधित असलेल्यांनाही नव्हती. आशीष देव यांनी एका स्नेह्य़ाच्या मागे लागून संमेलन पत्रिकेची छायांकितप्रत मिळविली. आयोजन कसे असावे, पत्रिका कोणाला द्याव्यात हा आयोजकांचा अधिकार असला तरी जिल्ह्य़ातील अनेकांना त्यात न्याय न मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले.  शेष देवुरमल्ले या संवेदनशील बालकवीचा वेश्यांच्या भावजीवनावर ‘लाल दिव्यातील नग्नसत्य’ हा काव्यसंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. प्रशांत मडपूवार हा नाटय़ कलावंत आणि चांगला कवी आहे. दोन कवितासंग्रह नावावर असलेल्या प्रशांतच्या कवितांवर आधारित  सीडी बाजारात उपलब्ध आहे. शेष आणि प्रशांतचे कौतुक तर सोडाच पण निमंत्रितांमध्ये त्यांचे नावही नव्हते. वनमजूर असलेला रंगनाथ रायपुरे हा कवी चंद्रपूरच्या संघर्षांतून पुढे आला. कल्पी जोशी या संवेदनशील कवयित्रीचे नाव फेसबुकवाल्यांना नवीन नाही, पण तिचीही उपेक्षाच झाली. तिच्याही नावावर कवितासंग्रह आहे. किशोर मुगल, रवी धारणे हे या परिसरातील उदयोन्मुख गझलकार, मधुकर गराटे, बी.सी. नगराळे यासारखे कवी सातत्याने वर्तमानपत्रातून कविता लिहितात, पण त्यांनाही निमंत्रित म्हणून वगळण्यात आले. एकूण ‘भाईभतिजावाद’ या संमेलनात प्रकर्षांने जाणवला.  
गेल्यावर्षी वि.सा. संघातर्फे नागपुरातील राज्यस्तरीय लेखिका संमेलनातील कविता स्पर्धेत चंद्रपूरच्या वर्षां चोबे यांची ‘चेकमेट’ कविता प्रथम क्रमांकावर होती. तिचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र तळोधी बाळापूरच्या संमेलनात निमंत्रितांमध्ये बोलावणे शक्य नसले तरी पत्रिका पाठवण्याचे सौजन्य संघाच्या कार्यकारिणीने दाखवले नाही. ठराविक साच्यातले परिसंवाद, ग्रंथदिंडी, वक्ते, मुलाखतींच्या साच्याच्या बाहेर पडून नावीण्याचा, विधायकतेचा शोध घेऊन गुणवंतांना संधी दिली असती तर संमेलनाचे सोने झाले असते आणि भाईभतिजा वादापासून संमेलनाला दूर राहता आले असे. वि.सा. संघाशी संबंधित लोक संमेलनात असणे यात काही गैर नसले तरी त्यात सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. कंपूशाहीचाच त्यात भरणा असल्याचे देव यांनी अधोरेखित केले. धन, श्रम, वेळ खर्च करून होणारी साहित्य संमेलने ‘सहितस्य’ म्हणजेच साऱ्यांच्याच हिताची, साऱ्यांनाच सामावून घेणारी, ‘भाईभतिजावाद’ न करणारी, प्रसंगी पात्र शत्रुनाही सन्मानाने बोलावणारी, सापत्नभाव न बाळगणारी संमेलने असावीत, नाही तर आहेच पुन्हा, ‘ये रे माझ्या मागल्या’.