दिवाळीच्या सुटीमध्ये बाहेरगावी फिरायला निघालेल्या मुंबईकरांमुळे यंदा खासगी ट्रॅव्हल्सची चांगलीच दिवाळी झाली आहे. रेल्वे आरक्षणे दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने आता पर्याय म्हणून प्रवासी खासगी बसचालकांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र इतर वेळी अगदी स्वस्तात ‘सीट’ विकणारे खासगी बसचालक सुटय़ांच्या मोसमात दुप्पट दर आकारणी करत आहेत. गोवा, कोल्हापूर, बेंगळुरू, अहमदाबाद, शिर्डी, औरंगाबाद, महाबळेश्वर येथे जाणाऱ्या सर्वच गाडय़ांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई-अहमदाबाद या मार्गाचे वातानुकूलित स्लीपर बसचे नेहमीचे तिकीट १००० ते १२०० रुपये आहे. सध्या मात्र हेच तिकिट १५०० ते २५०० रुपयांपर्यंत विकले जात आहे. तर मुंबई-महाबळेश्वर वातानुकूलित गाडीचे नेहमीचे तिकीट ५०० रुपयांपर्यंत असून त्याचा दर सध्या ७५० ते १००० एवढा आहे. मुंबई-बेंगळुरू मार्गावरील नेहमीचे तिकीट दर वातानुकूलित बससाठी १५०० रुपये असतात. दिवाळीच्या मोसमात हे तिकीट २००० ते २५०० रुपयांना विकले जाते. मुंबई-गोवा या मार्गासाठीही नेहमीच्या
७५०-८०० रुपयांऐवजी १४००-१५०० रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. मात्र त्यातही बडे खासगी बससेवा पुरवठादार आपले दर फार वाढवत नाहीत. छोटे ट्रॅव्हल्सवाले सीझनप्रमाणे दर चढे ठेवतात, असे निरीक्षण ‘फण्डेज हॉलिडेज’च्या ओंकार तिरोडकर यांनी नोंदवले.
दिवाळीच्या सुटीत राजस्थानला पर्यटकांची जास्त पसंती असल्याने यंदा अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या बसची संख्या जास्त आहे. पर्यटक अहमदाबादहून खासगी वाहनाने राजस्थान फिरणे पसंत करतात. त्यामुळे सध्या दर दिवशी १५०-१६० बसगाडय़ा अहमदाबादच्या दिशेने जात आहेत. त्याखालोखाल गोव्याला जाण्यासाठीही जास्त गाडय़ा निघत असून त्यांची संख्या १००-१२०च्या घरात असल्याची माहिती ‘ओम ट्रॅव्हल्स’च्या सर्वेश नाईक यांनी दिली.

संपूर्ण मुंबईभरातून बुकिंग्ज
खासगी बसगाडय़ांसाठी केवळ एकाच ठिकाणाहून नाही, तर संपूर्ण मुंबईभरातून आरक्षण असल्याचे सांगितले जात आहे. यात बोरिवली, दादर, मुंबई सेंट्रल, ठाणे, वाशी, बेलापूर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. अहमदाबादकडे जाणाऱ्या काही गाडय़ा दादर-बोरिवलीमार्गे जात असून काही गाडय़ा ठाणे-घोडबंदरमार्गे जातात. तर गोव्याकडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा वाशीमार्गेच जात आहेत. या गाडय़ांमधून दर दिवशी अंदाजे १००० ते १५०० प्रवासी मुंबईबाहेर जात आहेत.

पॅकेज बुकिंग्जचाही पर्याय
पर्यटकांच्या मागणीचा विचार करून काही खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी पॅकेज देण्याचा प्रकार सुरू केला आहे. या पॅकेजमध्ये दोन्ही वेळच्या बसचा खर्च, एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि पर्यटन स्थळे फिरण्याचा खर्च यांची व्यवस्था आहे. या पॅकेज बुकिंग्जना सध्या तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे तिरोडकर यांनी सांगितले. बस ट्रॅव्हल कंपनीवर विश्वास ठेवण्याऐवजी पर्यटक एखाद्या टूर ऑपरेटरकडून आपल्या सहलीचे नियोजन करणे पसंत करतात, असे ते म्हणाले.

विशेष रेल्वे गाडय़ा रिकाम्याच
खासगी बसचालक दुपटीपेक्षा जास्त दर आकारत असले, तरी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी बसप्रवासालाच अग्रक्रम दिला असून कोकणात जाणाऱ्या विशेष रेल्वेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. करमाळीपर्यंत धावणाऱ्या वातानुकूलित डबलडेकर गाडीची तिकिटे सध्या साधारण दरांत मिळत असूनही काही ठरावीक दिवस सोडले, तर ही गाडी ओस पडली आहे. या गाडीच्या एकूण आसनव्यवस्थेपैकी निम्म्याहून अधिक आसने भरलीच नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या गाडय़ांनाही लोकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
दरपत्रक
    मार्ग                 जुना दर      सध्याचा दर

    मुंबई-गोवा          ७५०/८००    १५००

    मुंबई-अहमदाबाद   १०००       १५००

    मुंबई-महाबळेश्वर   ५००         १०००

    मुंबई-बेंगळुरू       १५००       २५००

    मुंबई-इंदूर          १२००       २०००