पश्चिम रेल्वेवर सध्या भरपूर नवनवीन घडामोडी सुरू असून येत्या काळात त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी अंधेरी स्थानक आहे. अंधेरी स्थानकात पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंची फेररचना करण्यात येत आहे. पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील तिकीट खिडकी, स्टेशन मास्टरचे कार्यालय आदी आस्थापने आता रेल्वेमार्गाच्या वरील उन्नत प्लॅटफॉर्मवर जाणार आहेत. अंधेरीला खंडित होणारी हार्बर सेवा आता या उन्नत प्लॅटफॉर्मखालून पुढे गोरेगावच्या दिशेने जाणार आहे. तर पूर्वेला मेट्रो स्थानकाला रेल्वे स्थानकाशी जोडणारा पादचारी पुल, उन्नत रिक्षा स्टँड आणि तिकीट बुकिंग ऑफिस आदी सुविधा होणार आहेत.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गाचे अनावरण लवकरच होणार असून त्या दृष्टीने वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंना विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. पश्चिमेकडे अंधेरीला संपणारी हार्बर मार्गाची सेवा आता पुढे गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. त्यासाठी अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील सर्व कार्यालये हटवावी लागणार आहेत. या ठिकाणी एक उन्नत प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून तेथे ही कार्यालये, तिकीट आरक्षण केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तर हार्बर मार्गाचे रूळ या प्लॅटफॉर्मच्या खालून गोरेगावच्या दिशेने जातील.
पूर्वेकडे मेट्रोचे अंधेरी स्थानक तयार झाले आहे. या स्थानकात उतरून पुढे रेल्वेने जाण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांना स्थानकात थेट येण्यासाठी १० मीटरचा पादचारी पुल असेल. त्याचप्रमाणे याच ठिकाणी पाचव्या रेल्वेमार्गाच्या बाजूला खास व्यक्तींच्या वाहनांसाठी वाहनतळ बांधण्यात येणार आहे. या वाहनतळाच्या बाजूने रेल्वे स्थानकाची नवी इमारत असेल. याच बाजूला रिक्षांसाठी उन्नत रिक्षा स्टँड बांधण्यात येईल. हा स्टँड पादचारी पुलाने थेट स्थानकाशी जोडलेला असेल. तसेच या स्टँडवरून रिक्षा थेट आगरकर चौकातून पुढे मुख्य रस्त्याला लागतील. रिक्षांना स्टँडमध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी अशा दोन स्वतंत्र मार्गिकाही बांधण्यात येणार आहेत.
रिक्षा स्टँडजवळच पुलावरच उन्नत रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयही बांधण्यात येणार आहे. या कार्यालयात सहा तिकीट खिडक्या असतील. याच ठिकाणी प्रवाशांसाठी १० मीटर रूंदीचा स्कायवॉकही बांधण्यात येणार असून हा स्कायवॉक थेट स्थानकाबाहेपर्यंत जाणार आहे. या स्कायवॉकवरही बोरिवलीच्या दिशेला सहा तिकीट खिडक्या असलेले तिकीट आरक्षण कार्यालयही असेल.