सातपुडा पर्वतराजीत शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे या स्थितीचा लाभ उचलत काही बनावट डॉक्टरांनी आपले उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून याबाबत लवकरच व्यापक कारवाई करण्याची तयारी आरोग्य विभागाने चालविली आहे. दरम्यान, अशाच एका प्रकरणात बनावट डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
धडगाव तालुक्यात आरोग्य सेवांवर देखरेख करण्यासाठी शासन निर्णयानुसार ‘तालुका देखरेख समिती’ गठीत करण्यात आली आहे. समितीने जनसुनवाईत बनावट डॉक्टरांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढल्याची बाब निदर्शनास आणून दिली. धडगाव तालुक्यातील मोलगी रस्त्यावर इलाहाबाद येथे राहणारा राजपत नरेंद्र बहादुरसिंग यांचा बेकायदेशीर दवाखाना सुरू होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजपुत यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी करणारे लेखी पत्र देण्यात आले. परंतु ती कागदपत्रे राजपुतने दिली नाही. या विषयी विचारणा करण्यासाठी गेलेल्या पथकाला प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा केली असून ती घेऊन येतो असे सांगून राजपुतने पोबारा केला. या दवाखान्याची तपासणी केली असता कुठेही वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सापडले नाही. तसेच दवाखान्यात विविध औषधे, सुटय़ा गोळ्यांचे डबे, पाच सलाइनसह विविध प्रकारची अ‍ॅलोपॅथीची औषधे निदर्शनास आली. याशिवाय, जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही आवश्यक साधनांची सोय करण्यात आली नव्हती. त्रोटक वैद्यकीय ज्ञानाच्या आधारावर राजपुत यांचा सुरू असलेला वैद्यकीय व्यवसाय नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप तालुका देखरेख समितीने नोंदविला आहे. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी राजपुतला अटक केली. तालुक्यात बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट मोठय़ा प्रमाणावर झाला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष परमार यांनी मान्य केले. बनावट डॉक्टर गावातील लोकप्रतिनिधींकडे राहतात. त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोणीही धजावत नाही.