लंबोदर गणपती.. कुठे केवळ गजमुख.. एकाच रंगात रंगलेला ‘एकरंगी’.. मृदंगावर थाप देणारा नर्तक, अशी विविध रूपे इवल्याशा हातातून साकारली. ‘भाव तसा देव’ या उक्तीप्रमाणे साकारलेल्या बाप्पाची विविध रूपे गणेशभक्तांनी अनुभवली. निमित्त होते बालगणेश फाऊंडेशन व ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी आयोजित शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत बनविलेल्या उत्कृष्ट मूर्तीच्या प्रदर्शनाचे.
ऊर्जा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या शाडूमातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेतील उत्कृष्ट गणेशमूर्तीचे प्रदर्शन महात्मा फुले कलादालनात भरविण्यात आले आहे. उद्घाटनास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचे संस्कार बालवयात रुजावे, बदलत्या तंत्रज्ञानामुळे मातीशी तुटणारी नाळ अबाधित राहावी आणि मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रतिष्ठान सात वर्षांपासून शाडूमातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करत आहे. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, रासायनिक रंग पर्यावरणास कसे घातक आहेत याबाबत माहिती देण्यात येते, असे बोरस्ते यांनी सांगितले. मूर्ती विसर्जनानंतर तिचा वापर विविध मूर्ती वा वस्तू तयार करण्यासाठी कसा करता येऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यंदाच्या कार्यशाळेत महापालिका शाळेत शिकणाऱ्या चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांसह, खासगी शाळांमधील विद्यार्थी, कलाशिक्षक, शिक्षक आदींना सहभागी करून घेण्यात आले. चार टप्प्यात कार्यशाळा पार पडली. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी विविध आकारातील गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती घरात पूजेसाठी ठेवण्याचा आग्रह पालकांनी तसेच प्रतिष्ठानने धरला आहे.
सुबक मूर्तीसाठी प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीनसह खुल्या गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध गटातील सवरेत्कृष्ट अशा २५ कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेत निर्मिलेल्या सुबक मूर्ती नाशिककरांना पाहता याव्यात यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.