बाजारपेठेतील एका राहत्या घरात रहस्यमयरीत्या सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे कोडे उलगडण्यात अखेर पोलीस यशस्वी झाले. केवळ साडेचार-पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी एका ओळखीच्याच गर्भवती महिलेनेच त्या वृद्धेचा गळा घोटल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठोस पुरावा हाताशी नसताना पोलिसांनी दोन दिवसांतच या गुन्ह्याची उकल केली. यासंदर्भात पोलिसांनी गौरी राजेंद्र ओझा (वय ३३) या उच्चशिक्षित महिलेला अटक केली. ती आठ महिन्यांची गर्भवती आहे. सुभद्रा निवृत्ती वामन (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील मेन रोडवर असलेल्या राजेंद्र ओझा यांच्या मालकीच्या घरात रविवारी संध्याकाळी कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. संशयास्पद स्थितीत राहत्या घरात आढळलेल्या अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे तसेच गुन्हेगाराचा शोध घेण्याचे अवघड काम पोलिसांसमोर होते. तपासात आर्थिक चणचण व सोन्याच्या दागिन्याच्या हव्यासातून झालेल्या या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला.

ओझा यांच्या पत्नीनेच हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. गौरी ओझा ही गर्भवती असल्याने घरीच राहात होती. मृत वामन याही जवळच माळीवाडय़ात एकटय़ा राहात होत्या. दोघींची चांगली ओळख असल्याने वामन यांचे गौरीकडे कायम येणेजाणे व्हायचे. नेहमीप्रमाणे रविवारी वामन ओझांच्या घरी गेल्या. त्यांच्या गळय़ातील चार-पाच ग्रॅम सोन्याने ओझा यांना भुरळ घातली. त्यांच्या डोक्यात वेगळाच कट शिजला. त्यानुसार गोडीने बोलत वामन यांना त्यांनी वरच्या मजल्यावर नेले. कोणतीही कल्पना नसलेल्या वामन मोठय़ा विश्वासाने त्याच्यासोबत गेल्या, मात्र त्या विश्वासघाताच्या बळी ठरल्या. तेथे काही कळायच्या आत गौरीने वामन यांचे केस हातात धरून डोके िभतीवर आदळले. बेशुद्ध झालेल्या या महिलेचा गळा त्यांनी नायलॉनच्या दोरीने आवळला. घरासमोरील रस्ता रात्री उशिरापर्यंत वर्दळीचा असल्यामुळे गौरीला मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही. त्यामुळे मृत महिलेला अर्धवट पोत्यात टाकून तिच्या अंगावर चादर टाकली होती. मुलीने घरात दरुगधी येत असल्याची तक्रार केल्यानंतरही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र दररोज वाढत जाणाऱ्या दरुगधीमुळे अखेर घरात असलेला मृतदेह पोलिसांपर्यंत पोहोचला. तब्बल सहा दिवस या महिलेचा मृतदेह त्यांच्या घरात असल्याने त्याला मोठय़ा प्रमाणात दरुगधी सुटली होती. अखेर या दरुगधीनेच खुनाला वाचा फोडली. आरोपी गौरी ओझा हिला न्यायाधीश रा. मा. राठोड यांच्यासमोर उभे केले असता तिला एक दिवसाची कोठडी देण्यात आली. गळा आवळून खून केल्याचा प्रकार शवविच्छेदनानंतर समोर आला. पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, उपनिरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस कर्मचारी प्रसाद लावर, विजय साठे, संदीप गडाख, हनुमान उगले यांनी ओझा दाम्पत्याला विश्वासात घेतल्यावर गौरीने खुनाची कबुली दिली.