घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लहान वयातच कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी आल्याने अनेक मुलांना शिक्षणाकडे दुर्लक्ष करावे लागते. मुंबईतली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत हे चित्र घरोघर पाहायला मिळते. शिक्षणाची पुरेशी तोंडओळख व्हायच्या आतच शाळा सोडावी लागत असल्याने मुलांना जगातील अनेक नव्या गोष्टी शिकवणाऱ्या शाळेची दारेच बंद होऊन जातात. या मुलांना शिक्षणाची ओळख करून देण्याबरोबरच त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी डोंबिवलीतल्या व्हायसरस फाउडेशन संस्थेच्या माध्यमातून काही तरुण प्रयत्न सुरू केला आहे. धारावीमध्ये सहा महिन्यांपासून या तरुणांचे काम सुरू असून धारावीच्या बरोबरीनेच ठाण्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये हे तरुण शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत.
देशातील नंबर एकची झोपडपट्टी आणि सर्वात मोठे औद्योगिक केंद्र अशी ख्याती असलेल्या धारावीमध्ये शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत विकास या दृष्टीने अनेक सामाजिक संस्था काम करत असून त्या माध्यमातून धारावीचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सामाजिक आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने येथे शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक संस्थांकडून विविधांगी प्रयोग होत आहेत. अशाच एका उपक्रमामध्ये डोंबिवलीच्या तरुणांनी सहभाग घेतला असून तेथील विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. घरच्या बिकट परिस्थितीमुळे लहान वयातच जबाबदारी स्वीकारून काम करणाऱ्या मुलांना सामाजिक संस्था शालेय शिक्षण देत असल्या तरी त्यांना जगण्याची मूल्य आणि व्यवहारज्ञान शिकवण्याची गरज होती. डोंबिवलीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘व्हायरस’ या संस्थेने ऑगस्ट महिन्यात या मुलांसाठी काम सुरू केले. या महाकाय वस्तीतल्या मुलांमध्ये मूल्यशिक्षण रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. व्हायरसच्या सदस्यांनी या भागात जाऊन मुलांच्या एकत्र येण्याचे ठिकाण स्वच्छ करून त्याला रंगरंगोटी केली. मुलांना इंग्रजी आणि शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच त्यांच्याशी खेळ, विनोद, गप्पागोष्टींच्या माध्यमातून अनेक मूल्यं रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या या उपक्रमामध्ये पन्नासहून अधिक विद्यार्थी जोडले गेले असून यामध्ये प्रामुख्याने बाहेरच्या राज्यातून स्थलांतरित झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे. अनेकांची घरची परिस्थिती प्रतिकूल असून काहींना आई किंवा वडील असे एकच पालक आहेत.
व्हायरस फाउंडेशनबद्दल..
संगणकातील व्हायरस दूर करता येतो. मात्र समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांना मोठे काम करणे गरजेचे आहे. याच विचारातून डोंबिवलीतल्या महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी व्हायरस फाउंडेशनची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पथनाटय़ांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार, रेल्वे समस्या या विषयांवर काम केल्यानंतर या तरुणांनी शैक्षणिक क्षेत्रातील काम वाढवले. डोंबिवली परिसरातील आजदे गाव, ठाकुर्ली परिसरातील मॉडेल शाळा आणि सागर्ली या भागामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवण्यासाठी या मंडळींनी दोन वर्षांपासून सुरुवात केली आहे. त्याला जोडूनच गेल्या सहा महिन्यांपासून ही मंडळी धारावीमध्ये काम करत असल्याची माहिती फाउंडेशनची निकिता घमंडे हिने दिली.
या ग्रुपमध्ये निकिता घमंडे ही एमबीए करत असून पल्लवी गरगरे कायद्याचे शिक्षण घेत आहे. नेहा गंगण ही मानसोपचाराचे शिक्षण घेत असून प्रसन्न मोळके समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्यांच्यासोबत विश्वजीत बेलेल, प्रथमेश जठार, समीर जाधव, विक्रांत बुजगावकर आणि तार्केश भाटकर काम करत आहेत.