04 June 2020

News Flash

राखेच्या विषयावर सामंजस्याने तोडगा काढण्याचा परिसंवादातील सूर

काही दिवसांपासून महाजनको व डर्क इंडिया यांच्यातील वादामुळे एकलहरा कारखान्यातील राखेचा प्रश्न गंभीर होत असून, नाशिकच्या पर्यावरणासाठी तो त्रासदायक ठरत आहे.

| May 15, 2013 12:16 pm

काही दिवसांपासून महाजनको व डर्क इंडिया यांच्यातील वादामुळे एकलहरा कारखान्यातील राखेचा प्रश्न गंभीर होत असून, नाशिकच्या पर्यावरणासाठी तो त्रासदायक ठरत आहे. या विषयावर सामंजस्याने तोडगा निघावा व पर्यावरणाची हानी टाळावी, असा सूर येथे नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘एकलहऱ्याची राख व नाशिकचे पर्यावरण’ या विषयावर आयोजित परिसंवादातून निघाला.
या परिसंवादात डर्क इंडिया कंपनीचे अध्यक्ष डॉ. जॉर्ज डर्क, महाजनकोचे अभियंता विशाल पिंगळे, क्रेडाईचे अध्यक्ष किरण चव्हाण, लायन्स क्लबचे उप प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव, राख अभ्यासक सुनील मेढेकर, पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, शेखर गायकवाड, माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते आदी सहभागी झाले होते. या वेळी जॉर्ज डर्क यांनी वस्तुस्थिती मांडली. ज्या वेळी राखेवरील हा प्रकल्प सुरू करण्यात आला, त्या वेळी विद्युत प्रकल्पाने राख मोफत देण्याचे मान्य केले होते, परंतु पुढे वादविवाद होऊ नये यासाठी आम्हीच राखेचे पैसे महाजनकोला देत आहोत. केवळ एक पाइपलाइन टाकल्याने हा प्रश्न सुटणार असून त्यासाठी तब्बल ७० लाख लिटर पाणी रोज राख उचलण्यासाठी वाया घालविले जात आहे. या राखेचे प्रदूषण अधिक असून त्याचा पर्यावरणावरही परिणाम होत आहे, असे ते म्हणाले.
क्रेडाईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी शहराचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत असून, हिरवे प्रकल्प नाशिकमध्ये आले तरच नाशिकचा गारवा टिकून राहील, असे नमूद केले. महाजनकोचे अभियंता विशाल पिंगळे यांनी हा वाद न्यायालयात गेला असून जो निकाल येईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले. राख अभ्यासक सुनील मेढेकर यांनी येणारी पिढी सामाजिक विषयावर समन्वय साधत नसल्याचे दु:ख मांडले. या राखेचा ठेका एकाला देण्याऐवजी दीड-दोनशे मजूर उभे केले असते तर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता, परंतु महाजनकोने असे काही केले नाही, असे ते म्हणाले. उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते यांनी शासकीय पातळीवर जनतेच्या प्रश्नावर प्रचंड उदासीनता दिसून येत असल्याचे शल्य मांडले. आरोग्याला बाधा निर्माण होणार नाही यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. या वेळी नाशिकचे निसर्गप्रेमी अनिल माळी, मनीष गोडबोले, शेखर गायकवाड यांनीही मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2013 12:16 pm

Web Title: eklahera ash problem
टॅग Pollution
Next Stories
1 बसवेश्वरांचे कार्य आजही मार्गदर्शक – छगन भुजबळ
2 वामनदादांच्या आठवणींमधून शिकण्यासारखे बरेच काही
3 धुळे महापालिका निवडणुकीत केवळ महिला उमेदवार
Just Now!
X