माघारीच्या मुदतीनंतर जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी जिल्हा निवडणूक शाखा प्रत्यक्ष मतदानाच्या तयारीला लागली आहे. नाशिकसह संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडणार असली तरी सेना दलातील ८,८९७ तसेच मतदानाच्या दिवशी कार्यरत राहणारे जवळपास २५ हजार कर्मचारी अशा एकूण ३५ हजार २१० मतदारांसाठी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे. माघारीची मुदत संपुष्टात आल्यावर येरवडा शासकीय मुद्रणालयात या मतपत्रिकांची छपाई केली जाणार आहे.
सोमवारी उमेदवारी र्अज छाननीची प्रक्रिया पार पडली. बुधवापर्यंत माघारीची मुदत आहे. या मुदतीनंतर प्रत्येक मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात आहेत हे स्पष्ट होईल. या पाश्र्वभूमीवर, निवडणूक यंत्रणेने मतदानाशी संबंधित वेगवेगळ्या कामांना वेग दिला आहे. माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर दोन दिवसांच्या आत टपाली मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेणे बंधनकारक आहे. सेनादलातील मतदारांचे हे मुख्यत्वे मतदान असते. देशभरात वेगवेगळ्या भागात कार्यरत असणाऱ्या या मतदारांना मतपत्रिका वेळेत पाठविणे महत्वाचे असते. कारण, संबंधितांपर्यंत त्या वेळेत पोहोचल्या नाहीत तर त्या पुन्हा निवडणूक यंत्रणेपर्यंत येण्यास बराच वेळ लागतो. प्रारंभी विलंब झाल्यास संबंधितांच्या मतपत्रिका विहित मुदतीत प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी उमेदवार करत असतात. यंदा तसा आक्षेप घेण्यात येऊ नये म्हणून यंत्रणा तयारी करत आहे. या मतपत्रिका हाती पडल्यानंतर लगोलग त्या कोणाला व कुठे पाठवायच्या याची तयारी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात
सेना दलातील मतदारांची एकूण संख्या ८ हजार ८९७ आहे. त्यात देवळाली (१९१३), नांदगाव (१०१६), मालेगाव मध्य (७), मालेगाव बाह्य (६१६), बागलाण (६६२), कळवण (१३९), चांदवड (८८२), येवला (६२३), सिन्नर (१४५७), निफाड (५५८), दिंडोरी (१८०), नाशिक पूर्व (२९६), नाशिक मध्य (१८८), नाशिक पश्चिम (१८०), इगतपुरी (२३) यांचा समावेश आहे.
विधानसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी ४२१० मतदान केंद्रांवर एकूण २६ हजार ३१३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. संबंधितांचे नांव ज्या मतदान केंद्राच्या यादीत आहे, त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाऊ नये असा निकष आहे. वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नियुक्त होणऱ्या या कर्मचाऱ्यांनाही पारंपरिक मतपत्रिकेद्वारे मतदान करावे लागणार आहे.