News Flash

नाशिक व धुळे मतदारसंघावर ‘कसमादे’ चा प्रभाव

एरवी प्रादेशिकवाद, जातीयवाद, संकुचितपणा याविरोधात गर्जना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ठरविताना नेमक्या याच गोष्टींना महत्व देत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

| March 27, 2014 11:32 am

एरवी प्रादेशिकवाद, जातीयवाद, संकुचितपणा याविरोधात गर्जना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ठरविताना नेमक्या याच गोष्टींना महत्व देत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघात तर प्रत्येक निवडणुकीच हे चित्र दिसते. यंदाच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होत असून या दोन्ही मतदारसंघातील निकालावर प्रादेशिक अस्मितेचा घटक परिणामकारक ठरणार असल्याने कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव (कसमादे) या भागातील मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.
सिडको, सातपूर, अंबड या भागात प्रामुख्याने कसमादे भागातील रहिवासी आहेत. या भागातील मतदार ज्या उमेदवारामागे एकसंघपणे उभे राहतात. त्यास निवडणुकीत भरभक्कमपणे आघाडी मिळून विजयाचा मार्ग सूकर होत असतो. त्यामुळे या भागातील मंडळींवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय पक्षांकडून त्यांचीच बोली बोलणाऱ्या आणि त्याच भागातील नेत्यांना चौक सभांसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. कधीकाळी शिवसेना-भाजप युतीला भरभक्कमपणे साथ देणाऱ्या नाशिकमध्ये राहणाऱ्या कसमादे पट्टय़ातील मतदार मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेच्या बाजूने वळल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे मनसेचा उमेदवार कसमादे पट्टय़ातील नसतानाही हा चमत्कार घडून आला होता. राज ठाकरे यांच्या सभांची ही जादू असल्याचे मानले गेले. परंतु आता पुलाखालून भरपूर प्रमाणात पाणी वाहून गेले असल्याने या भागातील मतदार कोणाला साथ देतात, हे सांगणे मुश्किल आहे. त्यातच या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आघाडीकडून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव तसेच जनराज्य आघाडी ज्या कोणाला पाठिंबा देईल, त्याच्यासाठी आ. अपूर्व हिरे व समर्थक प्रयत्न करताना दिसतील. लोकसभेच्या या निवडणुकीतच पुढील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अवलंबून राहणार असल्याने त्यासाठी इच्छूकांना जोरकसपणे हालचाली कराव्या लागणार आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात कसमादे भाग असा प्रभावशाली ठरत असताना धुळे लोकसभा मतदारसंघातही सटाणा आणि मालेगाव या दोन तालुक्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते हे मागील निवडणुकीत स्पष्ट झाले होते. मागील लोकसभा निवडणुकीत युतीचे प्रतापदादा सोनवणे यांच्या पाठीशी या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भाग उभा राहिल्याने काँग्रेसचे अमरिश पटेल यांना पराभूत व्हावे लागले होते. सटाणा आणि मालेगाव या दोन्ही तालुक्यांचे हे उपद्रवमूल्य लक्षात घेऊनच यंदा अमरिश पटेल यांनी प्रामुख्याने या दोन्ही तालुक्यांवर लक्ष दिले आहे. सटाण्यात मागील आठवडय़ात आयोजित समता परिषदेचा मेळावा हा त्याचाच एक भाग होय.
या दोन्ही तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना, मंडळांना, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आपलेसे करण्याचा पटेल यांचा प्रयत्न सुरू आहे. मालेगाव शहरातील अल्पसंख्यांकांचे मतदान महायुतीच्या उमेदवारास मिळणे अशक्य असल्याने हे एकगठ्ठा मतदान आपणांस मिळावे म्हणून शहरातील अल्पसंख्यांकांवर प्रभाव असणारे ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांच्या उपस्थितीत आयोजित बैटकीत अल्पसंख्यांकांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शिरपूर या आपल्या बालेकिल्ल्यात आपण किती विकास कामे केली. हे सटाणा व मालेगाव तालुक्यातील जनतेला दाखविण्यासाठी त्यांच्यामार्फत गाडय़ांची खास व्यवस्था करण्यात आल्याचे म्हटले जाते.
दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांनीही या दोन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या आपल्या नातलगांच्या जाळ्यावर प्रचाराची भिस्त ठेवली आहे. खा. प्रतापदादा सोनवणे हे भामरे यांचे नातेवाईकच असल्याने त्यांचीही मदत त्यांना प्रचारासाठी होऊ शकते. ग्रामीण भागात नात्यागोत्याच्या राजकारणास अधिक महत्व असल्याने हा मुद्दा जितका अधिक प्रभावशील पध्दतीने मांडण्यात येईल, तितका प्रयत्न भामरे यांच्याकडून होणार हे निश्चित. त्यातच पाऊस आणि गारपीट याचा सटाणा तालुक्यास मोठय़ा प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणतीच मदत न मिळाल्याच्या मुद्याचा महायुतीकडून वापर करण्यात येत आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 11:32 am

Web Title: election in nashik
Next Stories
1 कळवण पोलिसांकडून ५१ दुचाकी चालकांविरोधात कारवाई
2 जाहीर सभांची रणनीती
3 नेत्रदानांविषयी आस्था, पण कार्यवाहीत अनास्था
Just Now!
X