* निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या कामात शिक्षक व्यस्त ’ परीक्षा पुढे ढकलणार
लोकसभा निवडणूक कामाच्या प्रशिक्षणासाठी शाळांमधील सर्व शिक्षकांना एकाचवेळी ‘बोलावणे’ आल्याने मुंबईतील, त्यातही पश्चिम उपनगरातील बहुतांश शाळांकरिता २ एप्रिलचा दिवस आणीबाणीचा ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी बहुतेक शाळांमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा आहेत. पण, शाळेतील जवळपास ८० टक्के शिक्षक प्रशिक्षणासाठी बाहेर असणार आहेत. त्यामुळे, परीक्षा घ्यायच्या कशा, असा प्रश्न या शाळांमधील मुख्याध्यापकांना पडला आहे. परिणामी बहुतांश शाळांनी २ एप्रिलच्या परीक्षाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मालाड ते दहिसर या पश्चिम उपनगरातील बहुतेक शाळांमधील शिक्षकांना २८ मार्च, २ एप्रिल, १४ आणि १५ एप्रिल या दिवशी निवडणूक कामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. बहुतेक शाळांच्या परीक्षा १० एप्रिलपर्यंत संपत आहेत. त्यामुळे, उत्तरपत्रिका तपासणीचे काम वगळता १४ आणि १५ एप्रिलला शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परीणाम होण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु, २ एप्रिलला सर्वच शाळांमध्ये हमखास परीक्षा असणार आहेत. त्यामुळे, अवघ्या १० ते २० टक्के शिक्षकांच्या मदतीने परीक्षा कशा घ्यायच्या, अशा अडचणीत मुख्याध्यापक सापडले आहेत. ‘ज्या दिवशी परीक्षा नाहीत, त्या दिवशी शिक्षकांच्या गैरहजेरीचा फारसा परिणाम जाणवणार नाही. पण, परीक्षेच्या दिवशी त्यातही २ एप्रिलला शाळांची चांगलीच तारांबळ उडणार आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘शिक्षक भारती’चे प्रसिद्धी सचिव आणि हंसराज मोरारजी शाळेचे शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केली. काही शाळांनी या आणीबाणीवर तोडगा काढण्याकरिता २ एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमच्या शाळेमधील ८० टक्के शिक्षक २ एप्रिलला प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने आम्ही या दिवशीच्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याचे ठरविले आहे,’ असे ‘मुंबई मुख्याध्यापक संघटने’चे उपाध्यक्ष आणि कांदिवलीच्या ‘हिल्डा कॅस्टॅलिनो मराठी शाळे’चे मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांनी सांगितले. ही आणीबाणी उद्भवेल म्हणून आम्ही वेळापत्रक आखताना आधीच शनिवारचा दिवस विनापरीक्षेचा ठेवला होता. या दिवशी आम्ही २ एप्रिलच्या परीक्षा घेऊ, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

यंदाच हा खड्डा का?
निवडणुकीच्या प्रशिक्षणाकरिता आतापर्यंत एखाद्या शाळेतील शिक्षकांना एकाचवेळी प्रशिक्षणासाठी बोलावले जात नसे. एखाद्या शाळेतील एक किंवा दोन शिक्षकांनाच प्रशिक्षणाचे बोलावणे येई. त्यामुळे, शाळेच्या दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होत नसे. पण, यावेळी एका शाळेतील सर्वच शिक्षकांना एकाचवेळी प्रशिक्षणासाठी बोलावणे आले आहे. त्यामुळे, शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत मोठा खड्डा पडणार आहे. शिवाय हे प्रशिक्षण तीनतीन दिवस चालणार आहे.