सोलापूर व शहर परिसरात सार्वजनिक उत्सवाची परंपरा १२७ वर्षांची असून यंदाच्या वर्षी १३५१ सार्वजनिक मंडळांनी श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. अखेरच्या तीन दिवसात गणरायापुढे देखावे सादर करण्यात येत आहेत. यंदा हलत्या देखाव्यांमध्ये पौराणिक विषयांपासून ते नवी दिल्लीतील ‘निर्भया’ वरील बलात्कार, अंनिसचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपर्यंतचे विषय मांडण्यात आले आहेत.

पूर्व भागातील जोडभावी पेठेत चतन्य मित्रमंडळाने व बाळीवेशीतील वडार समाजाच्या अय्या गणपती मंडळाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यातील निर्घृण हत्येचा देखावा सादर करुन समाजातील वाढती भोंदूगिरी, बुवाबाजीवर प्रकाश पाडला आहे. तर लोधी गल्ली (लष्कर) येथील जय शंकर मित्रमंडळाने नवी दिल्ली येथे गेल्या १६ डिसेंबर रोजी गाजलेल्या ‘निर्भया’ वरील बलात्कार व हत्या प्रकरणात चौघा नराधमांना न्यायालयाने दिलेल्या फाशीचा देखावा मांडला आहे. भवानी पेठ-घोंगडे वस्ती येथे मातृभूमी मंडळाने मुंबईत अलीकडेच शक्ती मिल आवारात वृत्तपत्र महिला छायाचित्रकारावर नराधमांनी केलेल्या दुष्कर्मावर आधारित देखावा सादर करून महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
बाळीवेशीतील कसबा गणपती मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषयांवर भव्य-दिव्य देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. रामायणातील ‘लव-कुश’ हा देखावा यंदा सादर करण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी लोटत आहे. सात रस्ता भागातील मोरया प्रतिष्ठानने भक्त प्रल्हादाच्या कथेतील प्रसंगावर आधारित देखावा सादर केला आहे. तर टिळक चौक तरुण मंडळाने जगप्रसिध्द जगन्नाथपुरी यात्रेचा नयनरम्य देखावा सादर करुन आपली वैशिष्ठय़ परंपरा कायम राखली आहे. रेल्वेलाईन्स-जीवनमहाल चौकात दादाश्री गणपती प्रतिष्ठानतर्फे उत्तराचंल मधील केदारनाथ मंदिराची प्रतिकृती मांडण्यात आली असून या मंदिराची रचना हैदराबादच्या कारागिरांनी साकारली आहे.
पूर्व भागातील विनायक मित्र मंडळाने तिरुपतीच्या ब्रह्मोत्सवातील सूर्यवाहन तयार करुन कलाविष्कार घडविला आहे. साखर पेठेतील लखपती हनुमान मंडळाने मोठा एलसीडी प्रोजेक्टर लावला असून त्यावर बालगोपाळांसाठी धार्मिक कथा आणि चित्रपट कार्टून दाखविण्यात येत आहेत. पूर्व भाग मध्यवर्ती मंडळाच्या ताता गणपतीपुढे थर्माकोलपासून बनविलेल्या मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे.