नव्याने आलेल्या फॅशनचे तयार कपडे, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो वा फळे, भाज्यांपासून काहीही एकाच ठिकाणी मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे जुहू येथील इर्ला सोसायटी रस्ता. या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील बाजारात फक्त पदपथच नव्हे तर रस्त्यावरील अध्र्या भागात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेचा के-पश्चिम विभाग तसेच नव्याने निर्माण झालेला वाहतूक पोलिसांचा सांताक्रूझ विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली असली तरी काही वेळानंतर पुन्हा अतिक्रमण होत असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होत नसल्याचे आढळून येत आहे.
फक्त अध्र्याहून कमी किलोमीटरचा हा महत्त्वाचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागत आहे. याबाबतचे वृत्त ‘मुंबई वृत्तान्त’ने प्रसिद्ध केल्यानंतर झोपलेले पालिका अधिकारी आणि वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत. आठवडय़ाचे सातही दिवस सकाळ, दुपार वा संध्याकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. किंबहुना रस्त्याच्या दुतर्फा बिनधास्तपणे गाडय़ा उभ्या करून शॉपिंगसाठी जाणाऱ्या उच्चभ्रूंपुढे वाहतूक पोलीसही नतमस्तक झाल्यासारखे वागत होते. इतरवेळी कुठेतरी गाडी उभी केली म्हणून क्रेनची धास्ती दाखविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी क्रेन या मार्गावर कधीच फिरकत नव्हती. इर्ला रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या तब्बल ४० ते ५० दुकानांकडून मिळणारी ‘पुडी’ हे प्रमुख कारण वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमागे असल्याचे सांगितले जाते. इर्ला सोसायटी रस्ता वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त व्हावा यासाठी सुरू झालेल्या बचाव आंदोलनात भाजपचे आमदार पराग अळवणी हेदेखील सहभागी होणार आहेत.
नव्याने निर्माण झालेल्या सांताक्रूझ वाहतूक विभागात इर्ला रस्ता येतो. आपण काही दिवसांपूर्वीच सूत्रे स्वीकारली असून तात्काळ कारवाई सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत इर्ला रस्ता ‘झिरो पार्किंग’चा असेल असे सांताक्रूझ वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महावीर तिवटणे यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे. तर इर्ला रस्त्यावरील अतिक्रमणावर नियमित कारवाई केली जाते. आमच्यावर रेल्वे स्थानकांजवळील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे सतत इर्ला मार्गावर कारवाई करता येत नाही, अशी हतबलता के-पश्चिम विभागाचे साहायक आयुक्त पराग मसुरकर यांनी व्यक्त केली आहे.