गणित, विज्ञानाबरोबरच इंग्रजी संभाषणाचे धडे ‘डायरेक्ट-टू-होम’च्या (डीटीएच) माध्यमातून रिमोटच्या एका बटनावर देणाऱ्या ‘एज्युटेनमेंट’ कार्यक्रमांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून ‘सेट टॉप बॉक्स’ पुरवठादार कंपन्यांनी टेलिव्हीजन आता अधिकाधिक ‘शिक्षणमनोरंजनपर’ करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहून प्रादेशिक भाषांमधूनही हे कार्यक्रम सुरू करता येतील का, याची चाचपणी काही कंपन्या करू लागल्या आहेत.
‘इडियट बॉक्स’ म्हणून सतत ज्याची हेटाळणी केली जाते त्या ‘टेलिव्हीजन’ला एज्युटेनमेंट करण्याच्या उद्देशाने २००६ साली सर्वप्रथम टाटा स्कायने ‘अॅक्टीव्ह फन लर्न’ ही अतिरिक्तची सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली.
त्यानंतर त्यात स्मार्ट गेम्स, अॅक्टीव इंग्लिश, वेदीक मॅथ्स यांची वेळोवेळी भर पडत गेली. यापैकी सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे तो इंग्रजी संभाषणावरचा. टाटा स्कायनंतर ‘एअरटेल डिजिटल टिव्ही’ या सेटटॉप बॉक्स पुरवठादार कंपनीनेही आपल्या ‘आयकीड्सवर्ल्ड’च्या माध्यमातून अमरचित्रकथा, जातक, पंचचंत्रच्या गोष्टी सांगणे, गणित-विज्ञानावरचे धडे, गाणी, ओरिगामी, चित्रकला, कार्टूनिंग, भाज्यांद्वारे सजावट, योग, पाककलेचे धडे आदी गोष्टी पुरविण्यास सुरुवात केली.
मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जागरूक पालकांची गरज ओळखून मनोरंजनपर वाहिन्यांच्या जोडीला शिक्षण, इंग्रजी संभाषण, गणित, विज्ञान अशा विषयांवरील कार्यक्रम सेट टॉप बॉक्सचे पुरवठादार सुरू करू लागले. पण, आता या कार्यक्रमांची इतकी सवय प्रेक्षकांना झाली आहे की टाटा स्कायने लहान मुलांसाठी म्हणून सुरू केलेल्या अॅक्टिव्ह इंग्लीशला तर गृहिणींचा तसेच कामाच्या ठिकाणी इंग्रजी संवाद अपरिहार्य असल्याने संभाषणाचा दर्जा उंचावू इच्छिणाऱ्या नोकरदारांचाही प्रतिसाद लाभतो आहे.
‘आमच्या एकूण ग्राहकांपैकी २८ टक्के ग्राहकांकडून या सेवांची नियमित मागणी असते. भारतातील टायर-टू शहरात हा प्रतिसाद सर्वाधिक आहे. म्हणूनचे आमचे काही कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे,’ असे ‘टाटा स्काय’च्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या व्यवस्थापक नीदा पालोबा यांनी सांगितले.
या कार्यक्रमांमधील शैक्षणिक उपयुक्ततेमुळे केवळ घरांमधूनच नव्हे तर शाळाही या सेवा घेण्यात आघाडीवर आहेत. उदाहरणार्थ टाटा स्कायचे अॅक्टीव सेवेच्या देशभरातून सुमारे १४०० शाळा ग्राहक आहेत. एअरटेल डिजिटल टिव्हीने तर इंग्रजी, हिंदी बरोबरच तामिळ, कन्नड भाषेतील बडबडगीते उपलब्ध करून दिली आहेत.