प्राध्यापकांच्या संपामध्ये तडजोड होत नसल्याने शिवाजी विद्यापीठांतर्गत परीक्षा पुढे जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर याचा परिणाम घडणार आहे.    
सहावा वेतन आयोगातील फरक मिळावा, प्राध्यापकांच्या सेवा-शर्ती लागू व्हाव्यात या मागणीसाठी प्राध्यापकांनी महाविद्यालयीन कामकाजावर बहिष्कार घातला आहे. प्राध्यापकांचे कामकाज ठप्प झाल्याने त्याचा शैक्षणिक कामावरही परिणाम घडला आहे. आता तर या परिणामाची टाच परीक्षेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत २७९ महाविद्यालये असून त्यामध्ये अडीच लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी सव्वालाख विद्यार्थी २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी बसणार होते. तथापि प्राध्यापकांच्या संपामुळे परीक्षेचा कालावधी पुढे जाणार असून तो निश्चित कधी सुरू होणार हेही अनाकलनीय बनले आहे. त्यामुळे विद्यार्थिवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.    
शिवाजी विद्यापीठाचे प्रशासन व प्राध्यापकांची संघटना असलेली सुटा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. पण प्राध्यापक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने ती निष्फळ ठरली होती. कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी प्राध्यापकांशी चर्चा करून फारसे काही हाती लागले नसल्याची हतबलता व्यक्त करीत हे प्रकरण लवकर मिटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गतवर्षी प्राध्यापकांच्या भूमिकेमुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ४५ दिवस पुढे गेले होते. त्यामुळे निकाल उशिरा लागण्याबरोबरच शैक्षणिक कामकाजही विलंबाने सुरू झाले होते. आता तर परीक्षेवरच टांगती तलवार लागली आहे.