महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम भागात आदिवासींसाठी कार्यरत आमटे कुटुंबीय संचलित लोकबिरादरी प्रकल्प प्रदर्शन स्वरूपात डोंबिवलीकरांच्या भेटीस आले आहे.
२८ एप्रिल ते २ मे या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील आनंद बालभवनमध्ये सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात लोकबिरादरी प्रकल्पातील थरारक जिवंत अनुभव छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. बांबूच्या साहाय्याने तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. प्रकल्पातील दवाखान्याच्या डागडुजीसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची लोकबिरादरी प्रकल्पाला गरज आहे. या वास्तूला हातभार लावण्यासाठी डोंबिवली परिसरातून निधी उभा करावा म्हणून सुनंदा हॉलिडेजच्या शोभना साठे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा गावात चाळीस वर्षे राबून उभा केलेला लोकबिरादरी प्रकल्प १४० छायाचित्र, हस्तद्योगाच्या माध्यमातून नागरिकांना डोंबिवलीत या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे.