शहरातील आदिवासी विभागाच्या सात वसतिगृहांतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी येथील तहसीलदार व प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी, अधीक्षक तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत समस्या मांडण्यात आल्या होत्या. संबंधितांनी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले होते. सोमवारी विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम वळवी, विजय राऊत, उत्तम देसाई, प्रीतम पाडवी, जोगेंद्र पाडवी व विकास वसावे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. तीन-चार महिन्यांपासून मासिक भत्ता, प्रत्येक वसतिगृहाच्या इमारतीत संगणक व संगणक प्रशिक्षक, जलशुद्धिकरण यंत्र, इंटरनेट सुविधा, इन्व्हर्टर, दूरचित्रवाणी संच, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक संच, वाचनालयासाठी पुस्तकांची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या शिवाय पहिल्या सत्रानंतर दीपावलीच्या सुटीसाठी वसतिगृह बंद करण्यात येऊ नये, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. अनेक दिवसांपासून सौभाग्य मंगल कार्यालयातील मुलींच्या वसतिगृहात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या दूर करण्याची मागणीही होत आहे. निवेदनावर २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आहे.