सद्य:परिस्थितीत सामान्यांचा राजकारणावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. मतदानाला जनता तयार होत नाही, अशी विदारक परिस्थिती समाजकारण, राजकारणामध्ये निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आज देखील आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासारखे लोकप्रतिनिधी कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतात ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. सामाजिक ऋण फेडणारे नेते व कार्यकत्रे राजकारणात सत्तेवर आले पाहिजेत, असे प्रतिपादन भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आमदार हाळवणकर यांच्या कार्याचा तिसरा लेखाजोखा अहवालाचे प्रकाशन, फिरत्या कार्यालयाचे उद्घाटन आणि वेबसाईटचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात श्री. मुनगंटीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत पाटील होते.
मुनगंटीवार म्हणाले, भ्रष्ट कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रत्येक कामाचा योग्य तो ‘हिशेब’ घेतला जात असताना जनतेच्या प्रति प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा हिशोब आजही हाळवणकरांसारखे आमदार सादर करतात. राजकारणापासून परावृत्त होणाऱ्या जनतेने पुन्हा एकदा नवीन राजकीय वर्तुळ निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारवर विविध मुद्दय़ांवर प्रखर भाषेत टिका केली. महाराष्ट्रातील दुष्काळाला सत्तारुढ सरकारच जबाबदार असून राज्यातील नद्यांमध्ये पाणी असताना राजकीय नेत्यांच्या अंगात पाणी नसल्यानेच दुष्काळाची झळ राज्याला भोगावी लागत आहे, असा आरोप करताना मुनगंटीवार यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावरही टिकेची झोड उठवली.
गेल्या साडेतीन वर्षांत मतदारसंघात २० कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा करून आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, येत्या महिनाभरात मतदार संघात ६० कूपनलिका खोदण्यात येतील. भ्रष्ट, अनतिक मार्गाने आपली वाटचाल झाली तर प्रसंगी आमदारकीचाही राजीनामा देऊ.
यावेळी फिरत्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते, तर  वेबसाईटचा शुभारंभ आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते आणि लेखाजोखा ३ या दिनदíशका रुपी अहवालाचा प्रकाशन सोहळा आमदार मुनगुंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष विलास रानडे, मेघा चाळके, मिश्रीलाल जाजू, रामभाऊ चव्हाण, पुंडलिक जाधव, धोंडीराम जावळे, तानाजी पोवार, देवानंद कांबळे, विजया पाटील, बाबा देसाई, महादेव गौड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.