दहा दिवस भक्तिरसात न्हावून निघाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असून उद्या, बुधवारी अनंत चतुर्दशीला विदर्भातील विविध भागातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे तलावात विसर्जन तलावात होऊ नये असे न्यायालयाचे आदेश असल्यामुळे महापालिकेने शहरातील विविध भागातील तलावाजवळ आणि प्रभागांमध्ये १५० कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. शिवाय १० विसर्जनस्थळी वेगळे तलाव तयार करण्यात आले आहे.
विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मंडळाचे कार्यकर्ते तयारीला लागले असून महापालिका, पोलीस विभाग व पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटना विसर्जनाच्या कामासाठी सज्ज झाल्या आहेत. मिरवणुकीसाठी डीजे, ढोल-लेझीम पथके, ध्वजपथके, बँडपथक सज्ज आहेत. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, शेगाव या भागातील विविध तलावावर विसर्जनासाठी प्रशासनासह विविध पर्यावरणवादी आणि सामाजिक संघटनाची तयारी झाली आहे. तर शहरात फुटाळा तलाव, गांधीसागर, नाईक तलाव, सोनेगाव तलाव, सक्करदरा, अंबाझरी ओव्हर फ्लो, खदान तलाव, गोरेवाडा ओव्हर फ्लो, कोराडी तलाव तसेच संजय गांधी नगर या ठिकाणी विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. मोठय़ा मूर्ती फुटाळा, सोनेगाव तलावातच विसर्जित केल्या जातील. प्रत्येक ठिकाणी निरीक्षण मनोरा, पट्टीचे पोहणारे तसेच विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी यंदा नागपूर जिल्ह्य़ातील विविध गणेश मंडळांमध्ये १३२० च्या जवळपास लहान-मोठय़ा मूतीर्ंची स्थापना झाली आहे. शिवाय घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विविध जलाशयांवर गणेश विसर्जनासाठी गर्दी वाढणार असल्यामुळे पोलीस, महापालिका आणि काही स्वयंसेवी संघटना तलाव परिसरात मदतीसाठी राहणार आहे. शहरातील शुक्रवार तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव, सोनेगाव तलाव येथे घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे तर फुटाळा व कोराडी सार्वजानिक गणपती मंडळाचे गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.
विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी तलाव परिसरात राहून निर्माल्य गोळा करणार आहे. शिवाय तलावाच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. रेशीमबागेतील नागपूर राजा आणि एचबी टाऊनमधील विदर्भाची राजाची मिरवणूक बुधवारी सकाळी निघणार आहे. गणपती विसर्जनाच्या दृष्टीने मंडळाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहे. ढोल (संदल) लेझीमपथके, ध्वजपथके, बँडपथक यांची मागणी वाढली आहे. शहरातील सर्व तलावाच्या ठिकाणी निसर्गप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी निर्माल्य जमा करण्यासाठी उभे राहणार असून तलावात कुणीही हार फुल टाकू असे आवाहन वनराई, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, निसर्ग विज्ञान , नागूपर महापालिका, राष्ट्रीय हरित सेना, राष्ट्रीय सेवा योजना , ग्राहक मार्गदर्शक केंद्र, हस्तशिल्पी बहु सेवा सह संस्था, लोटस कल्चरल अ‍ॅन्ड असोसिएशन , विद्या भारती आदी विविध निसर्गप्रेमी संस्थेनी केले आहे.
गणपती विसर्जनाच्यावेळी नागरिकांनी गणपतीची मूर्ती शिरवताना तलाव आणि विहिरीत हार, निर्माल्य टाकून पाणी प्रदूषित न  करता घरीच एक खड्डा करून निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्माण करावे आणि परिसरात लावलेल्या झाडाझुडपांना द्यावे, असे आवाहन निसर्ग विज्ञान संस्थेने केले आहे.