मागील आठवडय़ात उरण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे येथील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे शेतीच्या सुक्या भाताच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या बदलत्या वातावरणात मान्सून हुलकावण्या देत राहिला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शासनाकडून दिली जाणारी बियाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उरण तालुक्यातील भातशेती ही पावसावरच अवलंबून आहे. अधिक मेहनत करूनही उतारा मिळत नसल्याने शेती करावी की नाही अशा पेचात शेतकरी अडकला आहे. मात्र शेतीवरील आपल्या प्रेमापोटी उरणमधील शेतकरी पदरमोड करून शेती करीत आहेत. उरण तालुक्यातील शेतीचे प्रमाण घटत असतानाही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून शेतीची अवजारे, बियाणे यांची गरज आहे.
मात्र शासनाकडून वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू घेण्यासाठीच शेतकऱ्यांना अधिक खर्च येत असल्याचे मत कोप्रोली येथील शेतकरी रुपेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. वीस गुंठे जमीन असेल तर शासनाकडून दिले जाणारे बी-बियाणे अपुरे पडत असून दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
मात्र, शासनाकडून नियमानुसारच अवजारे आणि बियाणांचे वाटप केले जात असल्याचे उरणचे कृषी अधिकारी के. एस. वसावे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येणाऱ्या अडचणींवर मात करीत उरण तालुक्यातील शेतकरी व त्यांचे कुटुंब शेतीच्या मशागती व बी पेरणीच्या कामाला लागले आहेत.