‘कृषिप्रदर्शन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप रत्नदीप सिसोदिया यांनी केला आहे. या संदर्भात गंगापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या आयोजकांनी मात्र सिसोदिया यांचे आरोप बिनबुडाचे असून हा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
येथील सातपूर त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस अकादमीसमोरील मोकळ्या मैदानात ‘कृषिप्रदर्शन २०१४’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात आयोजकांकडून ‘कृषिप्रदर्शनास भेट देणाऱ्या व्यक्तींची नोंद’ या आशयाचा मजकूर असलेली प्रवेशिका अर्ज व अन्य सहप्रायोजकांची नावे असलेली प्रवेशिका ३० रुपये वसूल करत दिली जाते. ३० रुपये हे वेगवेगळ्या चर्चासत्रासाठी, परिसंवादासाठी आकारले जात असल्याचे सांगितले जाते.
प्रवेशिकेच्या नावाखाली आयोजक मोठी रक्कम वसूल करत आहेत. शासनाकडून प्रदर्शनासाठी ठरावीक अनुदानही दिले जाते असेही ते म्हणाले.
प्रवेशिकेच्या प्रति करमणूक विभागाने कुठल्याही प्रकारची मान्यता दिलेली नसताना बेकायदेशीर पद्धतीने या रकमेची वसुली केली जात आहे, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
याबाबत संबंधित शासकीय कार्यालये यांच्याशी संपर्क साधला असता, टोलवाटोलवी केली जात असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आयोजकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत आयोजक संजय न्यायाहारकर यांनी सिसोदिया यांच्या आरोपात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही.
शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान न घेता हे काम सुरू आहे. ३० रुपये शुल्क केवळ प्रवेशासाठी आहे. चर्चासत्र, परिसंवाद संपूर्णत: नि:शुल्क आहे.