जून ते सप्टेंबर २०१३मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ातील ११ लाख ११ हजार २०८ हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून यापैकी ७ लाख ९९ हजार ६२२ हेक्टरवरील शेतपिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे. तसेच १३ हजार ४२६ हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून १ हजार ८८० हेक्टर ४८ आर शेतजमीन वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्वाधिक शेतजमीन वाहून गेल्यामध्ये नागपूर जिल्ह्य़ाचा क्रमांक पहिला लागतो.
या आपत्तीमध्ये सर्वाधिक शेतपिकांचे नुकसान चंद्रपूर जिल्ह्य़ात झाले आहे. या जिल्ह्य़ात ४ लाख ३९ लाख ९९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. यापैकी २ लाख ४२ हजार ८४० हेक्टरवरील शेतपिकांचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. ३ हजार ०५१ हेक्टर ५ आर शेतजमीन खरडून गेली तर ५० हेक्टर २ आर शेतजमीन पूर्णपणे वाहून गेली. नागपूर जिल्ह्य़ातील २ लाख ६८ हजार ८६८ हेक्टर ६४ आर मधील शेतपिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले.
४ हजार ६२६ हेक्टर ६९ आर शेतजमीन खरडून गेली तर ९८० हेक्टर ९९ आर शेतजमीन वाहून गेली. सर्वाधिक शेतजमीन वाहून गेल्यामध्ये नागपूर जिल्ह्य़ाचा क्रमांक पहिला लागतो. वर्धा जिल्ह्य़ात ९९ हजार ६६७ हेक्टर २२ आर शेतजमीनीवरील पिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले. ३ हजार ३३५ हेक्टर ४ आर शेतजमीन खरडून गेली तर ३३० हेक्टर ११ आर शेतजमीन वाहून गेली.
भंडारा जिल्ह्य़ातील १ लाख १९ हजार ०९६ हेक्टर ९७ आर शेतजमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झाले. त्यात ६४ हजार २४८ हेक्टर २१ आर जमिनीवरील शेतपिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले. २७५ हेक्टर ३९ आर शेतजमीन खरडून गेली तर ४० हेक्टर ६ आर शेतजमीन वाहून गेली. गोंदिया जिल्ह्य़ात ९६ हजार ५६१ हेक्टर ३७ आर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झाले. त्यातील ७१ हजार ४७२ हेक्टर १७ आर जमिनीवरील शेतपिकांचे ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाले. २९१ हेक्टर ४६ आर शेतजमीन खरडून गेली तर २ हेक्टर ३७ आर शेतजमीन वाहून गेली.
गडचिरोली जिल्ह्यातील ८७ हजार ०२२ हेक्टर ३ आर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झाले. त्यातील ५२ हजार ५२६ हेक्टर ५ आर जमिनीवरील शेतपिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले. १ हजार ८४६ हेक्टर ११ आर शेतजमीन खरडून गेली तर ४७६ हेक्टर २१ आर शेतजमीन वाहून गेली.
खरडून गेलेल्या शेतजमिनीत मातीचा भरणा केल्यास ती ऊपजाऊ होऊ शकते. त्यासाठी भरपूर परिश्रम आणि आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. पण संपूर्णपणे वाहून गेलेली शेतजमीन पुन्हा ऊपजाऊ करणे अशक्य आहे. अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले असताना त्यांच्या मदतीसाठी शासनाने फक्त २२६ कोटी ०७ लाख २२ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निधी तहसीलदारांकडे जमा केला आहे.
हा निधी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला नाही. नागपूर जिल्ह्य़ासाठी ७२ कोटी ७८ लाख ९८ हजार, वर्धा २५ कोटी ५४ लाख ८५ हजार, भंडारा ८ कोटी ९८ लाख ८९ हजार, गोंदिया १३ कोटी ५३ लाख २५ हजार, चंद्रपूर ८१ कोटी ८४ लाख ६२ हजार आणि गडचिरोली जिल्ह्य़ाला २३ कोटी ३६ लाख ६३ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.