मद्यधुंद अवस्थेत महिलेवर हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नसून या संशयितास त्वरीत अटक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवार येथील रहिवासी संतोष सानप यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. यासंदर्भात सिन्नर ठाण्यात त्यांनी तक्रारही केली आहे.
गुळवंच गावातील निवृत्ती सांगळे (४५) याने मद्यधुंद अवस्थेत चंद्रभागा खंडू सानप (६०) यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन संशयित एक आठवडय़ापासून फरार आहे. सानप कुटुंबियांनी हल्ल्यानंतर स्थानिक पोलीस  ठाण्यात निवेदन दिले. चंद्रभागा सानप यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, अशा तोऱ्यात संशयित व त्याचे साथीदार गावात फिरत आहेत.
या संशयितास अटक न झाल्यास सानप कुटुंबियांतील सर्व सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असा इशारा संतोष सानप यांनी दिला आहे.