लाँग लाईफ होम डेकोर लि. कंपनीने लातूर व परिसरातील लोकांची लाखो रुपयांची लूट केल्याप्रकरणी एका ग्राहकाच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा नोंदविण्यात आला.
शहरातील गांधी मैदान येथील पहिल्या मजल्यावर लाँग लाईफ होम डेकोर लि. कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी वाहने आदी स्कीमवर दिली जातात. ग्राहकांकडून दरमहा ठराविक हप्ते गोळा करणे व दीर्घ मुदतीचे हप्ते भरण्याची ही योजना होती. याची मोठी प्रसिद्धी करून सुरुवातीला लोकांचा विश्वास संपादन करून या जाळय़ात अनेकांना ओढण्यात आले. ‘जगातील आठवे आश्चर्य’ अशा मथळय़ाचे होर्डिग लावून ‘लाँग लाईफ’ नावाने एक वृत्तपत्रही प्रकाशित होऊ लागले.
लकी ड्रॉ योजनेत ग्राहकाला एखादी वस्तूचे बक्षीस लागले तर ते दिले जाई व ड्रॉमध्ये नाव निघाले नाही तर पूर्ण हप्ते भरल्यानंतर पैसे परत दिले जात. एखाद्याला मध्येच पैसे हवे असतील तर ३० टक्के कपात करून पैसे दिले जात. गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना वस्तू व पैसे दोन्ही मिळत नव्हते. कंपनीचे प्रमुखही फरारी झाल्यामुळे ग्राहक अस्वस्थ झाले होते. लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड व सोलापूर आदी जिल्हय़ांतील ग्राहकांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. फातिमा तांबोळी या सभासदाने गांधी चौक पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर कंपनीचे प्रमुख संभाजी दगडू पाटील, संगीता संभाजी पाटील, संग्राम नरहरी मुंडे, शिवकुमार सांगवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्यामुळे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव लटपटे यांनी सांगितले. दरम्यान, ‘लाँग लाईफ’मुळे ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लटपटे यांनी केले आहे. लाँग लाईफ कार्यालयातील संगणक व अन्य कार्यालयीन साहित्य जप्त करण्यात येणार आहे.