दिवाळीत फटाके आणि दिवाळीआधी त्यांची आवाजाची चाचणी हे सूत्र गेली काही वष्रे निश्चित झाली आहे. आवाजाच्या चाचणीत सर्व फटाके नापास होणार याचीही कल्पना असते. मात्र या चाचण्या घेणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या फटाक्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दरवर्षी उघड होत असूनही फटाक्यांचा बाजार तेजीत आहे.
१४ ऑक्टोबर रोजी चेंबूर येथील आरसीएफ मदानात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आवाज फाउंडेशनकडून विविध फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजण्यात आली. यासाठी सहा प्रकारच्या फटाक्यांच्या माळा व दहा प्रकारचे सुटे फटाके घेण्यात आले होते. फटाक्यांवर त्यात वापरण्यात आलेली रसायने व त्यांच्या आवाजाची पातळी लिहिणे बंधनकारक आहे. मात्र एकाही फटाक्यावर आवाजाची पातळी देण्यात आली नव्हती. तर १६ पकी केवळ नऊ फटाक्यांवर रसायने लिहिली होती. फटाक्यांच्या सहा माळांची चाचणी करण्यात आली व त्यातील सर्वच फटाक्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडली. तर सुटय़ा फटाक्यातील एकाने आवाजाची मर्यादा ओलांडली होती. इतर चार फटाके कमाल मर्यादेपर्यंत जात होते.
फटाक्यांवर रसायनांची नावे व आवाजाची पातळी लिहिली नसल्यास ती बेकायदा ठरतात. अशा फटाक्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. याशिवाय फटाक्यांवर दिलेल्या रसायनांप्रमाणेच ते तयार केले गेले आहेत का त्याचीही चाचणी व्हायला हवी, असे मत ‘आवाज फाउंडेशन’च्या समायरा अब्दुलाली यांनी व्यक्त केले.फटाक्यांच्या माळांपकी सर्वच फटाके ठरवून दिलेल्या आवाजापेक्षा अधिक मोठय़ाने वाजत होते. एका फटाक्यासाठी घालून दिलेली १२५ डेसिबलची मर्यादाही फटाक्यांनी ओलांडली. आकाशात सहा ते सात मजल्यांची उंची गाठून फुटणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या फटाक्यांचीही आवाजमापणी करण्यात आली. जमिनीवरून त्यांचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक होता. तर सहाव्या, सातव्या मजल्यावर राहणाऱ्यांसाठी तो अधिक असू शकतो, याकडे अब्दुलाली यांनी लक्ष वेधले.
दरवर्षी हे वास्तव समोर येते मात्र तरीही फटाक्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’कडे प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचे प्रमुख काम आहे. गेल्या काही वर्षांतील जागृतीमुळे बॉम्ब वाजवण्याच्या संख्येत घट झाली आहे. फटाक्यांचे आवाज, दिवाळीतील ध्वनीची पातळी याचा अहवाल करून संबंधित यंत्रणांना पाठवला जातो,’ अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी दिली. नवी मुंबईतील डायरेक्टोरेट ऑफ एक्स्प्लोझिव्हने फटाक्यांबाबत कडक कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.
* रहिवासी परिसरात ५५ डेसिबल तर शांतता क्षेत्रात ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत हीच मर्यादा अनुक्रमे ५० व ४० डेसिबल आहे. न्यायालय, शाळा, रुग्णालय यालगतचा १०० मीटर परिसर शांतता क्षेत्रात येतो.
* फटाक्यांच्या आवाजाची पातळी – ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार फटाक्यांना ९० डेसिबलची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर मानवी कानांना ग्रहणक्षम आवाजाची कमाल मर्यादा विचारण्यात आली. त्यानुसार १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज कानाच्या पडद्यांना हानी पोहोचवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत गृहीत धरून न्यायालयाने १२५ डेसिबलची मर्यादा घालून दिली. मात्र अजूनही काही फटाके ही मर्यादा ओलांडतात. ८५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजही त्रासदायक वाटतो. त्यातही मुंबईसारख्या गोंगाटाच्या क्षेत्रात फटाक्यांच्या आवाजावर बंदीच घालायला हवी, असे ध्वनिप्रदूषण नियंत्रणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटते.
* प्रकाशाच्या फटाक्यांचाही आवाज- आवाज करणाऱ्या अ‍ॅटमबॉम्ब, लक्ष्मीबॉम्बसारख्या फटाक्यांवर बंदी घालताना त्याऐवजी प्रकाशाचे, आकाशात जाऊन आकर्षक रोषणाई करणारे फटाके लावायला प्रोत्साहन दिले जाते. मात्र प्रकाशाच्या फटाक्यांचेही आवाज चढेच होते.