होणार होणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या मिहानमधील बोइंगच्या देखभाल व दुरुस्ती केंद्रावर आज अखेर एक जंबो विमान चाचणीसाठी उतरले. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला असून, आता देखभाल व दुरुस्ती केंद्राचे (एमआरओ) कोणत्याही क्षणी उद्घाटन होऊ शकते, असे मिहानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दशकापूर्वी सुरूझालेला मिहान प्रकल्प अद्याप ‘टेक ऑफ’ घेऊ शकलेला नाही. अनेक देशांचे महावाणिज्य दूत मिहानला भेट देऊन गेले, पण कुणीही गुंतवणूक करार केला नाही. भारतातील बडे उद्योजकदेखील येथे गुंतवणूक करण्यास सरसावले नाहीत. ज्या उद्योजकांनी मिहानमध्ये जमिनी घेतल्या ते उद्योग सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. असे चित्र असताना आज मिहानमध्ये बोइंगचा पहिला विमान उतरल्याने वैदर्भीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे रखडलेला ‘टॅक्सी-वे’चे काम पूर्ण झाले असून याच ‘टॅक्सी-वे’वरून बोईंग-७७७ हे विमान आज देखभाल आणि दुरुस्ती केंद्रापर्यंत (एमआरओ) गेले. हे विमान मुंबईहून नागपुरात दुपारी दीड वाजताच्या सुमारास उतरले.
बोइंगचा एमआरओ हा मिहानसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. गेल्या वर्षभरापासून एमआरओच्या आरंभाविषयी वेगवेगळ्या तारखा सांगण्यात येत आहेत. परंतु त्याचे उद्घाटन काही झाले नाही. आशियातील एक मोठा विमान देखभाल आणि दुरुस्ती (एमआरओ) केंद्र आहे. बोइंग विमान आज ‘टॅक्सी-वे’च्या चाचणीसाठी उतरल्याने मिहानकडे बघणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महिनाअखेर या केंद्राचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एमआरओ काय आहे?
बोइंगचा विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र (एमआरओ) ५० एकर जागेत आहे. बोईंगने १०७ दशलक्ष डॉलर खर्च करून प्रकल्प उभारला आहे. येथे दोन ‘हँगर’ आहेत. त्यात चार मोठी विमाने आणि सहा छोटी विमाने एकाचवेळी उभी केली जाऊ शकतात.
बोइंग कंपनीने भारताशी विमान विक्रीचा करार केला आहे. त्या करारातील अटीनुसार बोईंगने मिहानमध्ये एमआरओ उभारला आहे. तो एअर इंडियाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या एमआरओमध्ये प्रत्येक विमानाचे १२५ तासांचे उड्डाण झाल्यावर देखभाल तपासणी केली जाईल. तसेच प्रत्येक ४ ते ६ महिन्यांनी विमानांच्या सुटय़ा भागांची आणि यंत्रणेची सविस्तर तपासणी केली जाईल आणि प्रत्येक २० ते २४ महिन्यांनी विमानांच्या प्रत्येक घटकाची आणि यंत्रणेची सखोल तपासणी केली जाईल.