पालिका रुग्णालयातील प्रशासनाच्या चाकोरीबद्ध कामकाजाचा फटका दीड महिन्यांच्या ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ मुलाला बसला असून तब्बल पाच तास उपचाराविना काढावे लागल्याची घटना मंगळवारी केईएम इस्पितळात घडली. पाच तासांनंतर संबंधित मुलावर उपचार करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन अधिष्ठाता डॉ. संध्या कामत यांनी दिले आहे.
रत्नागिरी येथून सार्थ नांदगावकर या दीड महिन्यांच्या मुलाला त्याच्या पालकांनी अत्यवस्थ अवस्थेमध्ये मुंबईला आणले.
या मुलाच्या हृदयाला छिद्र असून अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत आहे. नांदगावकर दाम्पत्याने प्रथम मुलाला सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. सार्थवर तीन शस्त्रक्रिया करण्यात येणार असून अडीच ते पावणेतीन लाख रुपये उपचाराचा खर्च असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने नांदगावकर दाम्पत्याने मंगळवारी केईएम इस्पतळ गाठले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सार्थचा केसपेपर काढण्यात आल्यावर डॉक्टरांनी नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देत दीड तास थांबवून ठेवले.
अखेर सार्थच्या वडीलांनी अधिष्ठाता डॉ. संध्या कामत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून सार्थची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरीही सार्थला तात्काळ उपचार मिळाले नसल्याचे नांदगावकर कुटुंबियांचे म्हणणे आहे. सरतेशेवटी दुपारी दोन वाजता सार्थला तपासून हृदरोग विभागातील डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले. सार्थवर दोन शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. संध्या कामत यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व प्रकरणाची चौकशी करून सार्थला योग्य उपचार मिळतील, असे आश्वासन त्यांनी दिले.