‘बासरी’ या वाद्याला स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘गुरुकुल प्रतिष्ठान’च्या वतीने ‘बासरी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव येत्या १९ आणि २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे होणार आहे.
यंदा उत्सवाचे सहावे वर्ष आहे. यावर्षीपासून महोत्सवांतर्गत भारतीय शास्त्रीय संगीतात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया पुकस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. यंदा तमिळनाडू येथील प्रसिद्ध बासरीवादक डॉ. एन. रमणी यांचा या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. हरिप्रसाद चौरसिया या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
संगीत क्षेत्रातील दिग्गज या महोत्सवांतर्गत आपले कलाकौशल्य सादर करणार आहेत. तसेच ‘गुरुकुल प्रतिष्ठान’चे संस्थापक आणि प्रसिद्ध बासरी वादक विवेक सोनार ‘फ्लूट सिम्फनी’ या कार्यक्रम सादर करणार आहेत. पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा सुंदर मिलाप या महोत्सवांतर्गत पाहण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.