भौगोलिक सीमारेषा ओलांडून लोककला या जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी मुंबईत केले. लोककला अकादमी आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कालिना येथील विद्यानगरीत आयोजित केलेल्या परंपरा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तावडे बोलत होते.
लोककला चार भींतींच्या आत मर्यादित न राहता तसेच त्याचे सादरीकरण फक्त महोत्सव आणि नाटय़गृहांपुरते मर्यादित राहू नये. या लोककला महाराष्ट्राच्या जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लोकककलांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही तावडे यांनी सांगितले.
लोककलेचा प्रसार करण्यासाठी राज्यातील शंभर ठिकाणांची निवड केली जाईल आणि या ठिकाणी रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शासनाच्या वतीने लोककलांचे सादरीकरण केले जाईल, अशी माहितीही तावडे यांनी दिली. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर, लोककला अकादमीचे प्रकाश खांडगे, प्रा. गणेश चंदनशिवे आदी उपस्थित होते.