‘गोंधळाला या, मुख्यमंत्री तुम्ही गोंधळाला या’ असे उपहासात्मक साकडे घालीत बुधवारी गोंधळी, बागडी, जोशी आदी भटक्या समाजातील लोककलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ घातला.निमित्त होते या समाजाच्या विविध मागण्यांचे. या वेळी आंदोलकांनी लाक्षणिक उपोषण करीत शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 गोंधळी जोशी व तत्सम भटक्या समाजातील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्यासाठी असणारे आरक्षण ५ टक्क्य़ांवरून अडीच टक्के आणले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर ते १० टक्के करावे,समाजातील कलाकारांना मानधन मिळावे, जातीच्या दाखल्यातील जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करण्यात आले. संघटनेचे बापुसाहेब कवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधून घेतले.या आंदोलनाला भीमसेनेने पाठिंबा दिला होता. गोंधळी समाजातील आंदोलनस्थळी चक्क गोंधळ घातला. देवीला केलेल्या आवाहनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी गोंधळाला या, पालकमंत्र्यांनी गोंधळाला या, अशी विनंती करीत आमच्या मागण्यांना न्याय द्या, असे गाऱ्हाणे घातले. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून पुढील टप्प्यात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.