राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने क्षितिज प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेमार्फत नाशिक शहर व जिल्ह्य़ात विविध ठिकाणी अन्नसुरक्षा अभियान सुरू केले असून अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी शरणपूर रस्त्यावरील चायनीज् पदार्थ विक्रेते आणि आकाशवाणी टॉवर येथील सुमारे १५० व्यावसायिकांचा मेळावा घेऊन अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सध्या प्रतिष्ठानमार्फत सुरू असलेल्या नोंदणी व परवाना अभियानात प्रमाणपत्रे घेण्याचे आवाहन केले.
या वेळी व्यावसायिकांना प्रतिष्ठानमार्फत अर्जाचे नमुने देण्यात आले. शासकीय कार्यलयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत असल्याचे देवरे यांनी सांगितले. १२ लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या विक्रेत्यांनी प्रमाणपत्र तर १२ लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्यांनी अन्न परवाना घेणे बंधनकारक आहे. अन्यथा कडक शिक्षेची आणि दंडाची कायद्यात तरतूद असल्याचे देवरे यांनी व्यावसायिकांना बजावले. हे अभियान साहाय्यक आयुक्त चंद्रकांत पवार आणि एम. एम. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रतिष्ठानचे नितीन सोनवणे उपस्थित होते.देवरे यांनी अन्न परवाना सक्तीचा असून परवान्याबाबत मार्गदर्शन आणि नोंदणी प्रक्रिया व्यावसायायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी देणार असल्याचे सांगितले. परवाना नोंदणी अन्नपदार्थ उत्पादन बांधणी व विक्री, हॉटेल, कॅटरिंग, पान दुकान, किराणा, गूळ उत्पादक, आईस्क्रीम, रस, खारे शेंगदाणे उत्पादक व विक्रेते, देशी व विदेशी दारू दुकान, चिकन, मटण, मासे विक्रेते, वडापाव, चायनीज् पदार्थ, भेळपुरी, पाणीपुरी  विक्रेत्यांसाठी आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय सुरू ठेवल्यास अथवा परवाना नोंदणी न केल्यास सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व पाच लाख रुपयांपर्यंत दंड आहे.