जाज्वल्य इतिहास असणाऱ्या पैठणनगरीत शनिवार, २२ डिसेंबरपासून ३४व्या मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड असून, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, सूफी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पैठण येथे या संमेलनात ‘सातवाहनांचा राजदूत’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून, विविध वाङ्मयीन प्रकारावर परिसंवाद होणार आहे.
शनिवारी, २२ डिसेंबरला पैठण शहरातील नाथ मंदिरापासून ग्रंथदिंडी निघेल. छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा मार्गाने संमेलनस्थळी ग्रंथदिंडी जाईल. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन भालचंद्र देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. ‘संतसाहित्य आजही सत्त्वशील समाज घडविण्यासाठी समर्थ आहे’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. सदानंद मोरे भूषवतील. या परिसंवादात धाराशिवकर बाबा, डॉ. श्रीनिवास पांडे, डॉ. विद्यासागर पटांगणकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. शिवाजी भुकेले, विजयकुमार फड, भास्कर ब्रह्मनाथकर यांचा सहभाग असणार आहे.
याच दिवशी ‘आजच्या बदलत्या स्फोटक वास्तवाला मराठवाडय़ातील लेखक भिडत नाही’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. छाया महाजन भूषवतील. या परिसंवादात डॉ. साहेब खंदारे, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. पृथ्वीराज तौर, आसाराम लोमटे, डॉ. नवनाथ गोरे, डॉ. राजश्री पवार, शरद देऊळगावकर, प्रा. अशोक गुळवे यांचा सहभाग असणार आहे. रात्री ८ ते ११.३०पर्यंत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी प्रा. इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. श्रीकांत देशमुख, डॉ. पी. विठ्ठल व डॉ. गणेश मोहिते हे सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत प्रा. इंद्रजित भालेराव यांची मुलाखत घेणार आहेत. ‘सर्व स्तरातील मराठीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भाषिक समृद्धी देण्यास अपुरा पडत आहे’ या विषयावर तिसरा परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दादा गोरे असतील.
डॉ. केशव तुपे, भास्कर आर्वीकर, सुरेश सावंत, प्रा. मच्छिंद्र चाटे, डॉ. संजय मून, मंगेश अंबिलवादे, प्रा. ललित अधाने यांचा या परिसंवादात सहभाग असेल. दुपारी १२.३० ते २ या कालावधीत आठ लेखक कथाकथन सादर करतील.
भास्कर बढे, रेणू शिंदे, वसुधा देव, अर्चना डावरे, अर्जुन व्हटकर, कमलताई कुलकर्णी, संतोष तांबे, श्री महामुने यांचे कथाकथन होणार आहे. कार्यक्रमाच्या समारोपास विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार कल्याण काळे उपस्थित राहणार आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाटय़ रात्री सादर होईल.