‘पाटबंधारे खात्यानेच मोजून पाणी द्यावे’
भविष्यात शेती वाचवायची असेल तर आता पाटबंधारे खात्यानेच शेतकऱ्यांना पाईपद्वारे ठिबकच्या माध्यमातून पाणी मोजून दिले पाहिजे. उघडय़ा कालव्यांची संकल्पना आता कालबाह्य़ झाली आहे. तसे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे परखड मत माजी सहकारमंत्री शंकरराव कोल्हे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
कोल्हे यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याने ते पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. येथे त्यांची भेट घेतली असता प्रकृतीपेक्षा त्यांनी तालुक्यातील दुष्काळाचीच चिंता व्यक्त केली. त्याचीच माहिती त्यांनी घेतली.
कोल्हे म्हणाले, नवीन पाणी निर्मितीसाठी गोदावरी लाभक्षेत्रात मुकणी, कश्यपी, वालदेवीसारख्या धरणांसाठी निधी उपलब्ध करण्यास शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. प्रश्न सतत मांडत राहिलो. त्यातून धरणेही झाली, मात्र मुकणी धरण झाल्यावर नाशिक शहराने त्यावर अधिकार सांगितला. कश्यपी झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्राने अधिकार सांगितला. त्यामुळेच भविष्य कठीण आहे. बिगर सिंचनाचे आरक्षण सतत वाढते आहे. पाणी हा सर्वासाठी जीवनावश्यक घटक आहे. पाण्याचा प्राधान्यक्रम फक्त कागदोपत्री आहे. त्यात निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे दुष्काळ काही पाठ सोडत नाही. भविष्यात अजून किती पाण्याची निर्मिती होईल याची शाश्वती नाही, कारण सरकारकडून तसे कोणतेही नियोजन दिसत नाही.
शेती आणि शेतकऱ्यांपुढे भविष्यात अनंत अडचणी असणार आहेत. पाऊस सध्याच्या गतीनेच पडत राहिला तर विहीर आणि बागायत ही संकल्पनाच इतिहासजमा होणार आहे. मुळातच जगण्यासाठी शेतीशिवाय पर्याय नाही. दुग्धव्यवसायासह सर्व उद्योगांचा पाया शेतीच आहे. शेती कोलमडली तर इतर सर्व व्यवसायही अस्ताला जातात हे आपण अनेक वेळा अनुभवलेले आहे. त्यातून सहकारी साखर कारखानदारी, त्यावर आधारलेले इतर उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी चिंता कोल्हे यांनी व्यक्त केली.
काहीही झाले तरी शेती जगलीच पाहिजे, तरच माणसे, गुरेढोरे, उद्योग जगतील असे कोल्हे यांनी सांगितले. ते म्हणाले, पाणी मिळविण्यासाठी अनेक लढे उभारले, मात्र ज्यांच्यासाठी हे लढे उपयोगात येणार आहे ते शेतकरी लढय़ांना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. जोपर्यंत शेतकऱ्यांचा लढय़ातील सहभाग वाढत नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. भविष्यात शेतीची अवस्था अत्यंत गंभीर होणार आहे. शेतकऱ्यांनी थेंब ना थेंब पाण्याचा सदुपयोग केला पाहिजे. पाणीबचतीसाठी प्रयत्नपूर्वक उपक्रम राबविले पाहिजे. कालवे कालबाहय़ झाले आहेत, दुरुस्ती करूनही कालवाफुटीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय आपण टाळू शकत नाही. भविष्यात शेती जगवायची असेल तर थेट नांदूर मधमेश्वर बंधारा ते टेल भागातील प्रत्येक बाऱ्यापर्यंत बंद पाईपद्वारे पाणी दिले पाहिजे. ही संकल्पना स्वीकारण्याची मानसिकता
शेतकऱ्यांना करावी लागेल. प्रत्येकाने ठिबकने मोजून पाणी घेऊन शेतातील पिकांना दिले तरच आपण आपले भविष्य घडवू शकतो, असे ते म्हणाले.     

अर्ध्या एकराचे शेततळे
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन बागायत भागात शेततळय़ांना परवानगी दिल्याने शेती वाचवण्यास मोठा हातभार लागेल. या निर्णयाला गती देऊन मात्र पूर्वी जिरायत भागासाठी असलेले तळय़ांचे नियम न ठेवता बागायत भागात अर्धा एकराच्या शेततळय़ांना परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली.