बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे भासवत बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेत नागरिकांच्या बँक खात्यातून ‘ऑनलाईन’ पैसे लंपास करण्याचे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. सातपूर-अंबड लिंक रोडवर राहणारे भारत पाटील यांच्याबाबत असाच प्रकार घडला. नागरिकांनी वैयक्तिक बँक खाते आणि एटीएम कार्डच्या पीन क्रमांकाची माहिती कोणालाही या प्रकारे दुरध्वनीवर देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सातपूर-अंबड लिंक रोडवरील कैवल्य पार्कमध्ये वास्तव्यास असणारे भरत पाटील हे मुंगी ब्रदर्स येथे काम करतात. त्यांचे थत्ते नगरच्या एचडीएफसी बँकेत खाते आहे. काही दिवसांपूर्वी भ्रमणध्वनीवर त्यांना एका व्यक्तीचा दूरध्वनी आला. मुंबई येथील एचडीएफसीच्या मुख्य शाखेतून बोलत आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचे डेबीट कार्ड दोन दिवसात बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक कारवाईसाठी तुमचा खाते क्रमांक, ऑनलाईन व्यवहार ओळख संकेतांक तसेच इतर माहिती बोलण्याच्या ओघात घेतली. तुमचे पैसे आता तुमच्या डेबीट कार्डवर हस्तांतरीत करण्यात येतील असे सांगण्यात आले. मात्र, दुरध्वनी ठेवताच १८,९०० रुपये काढल्याचा त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश आला. मात्र पैसे खात्यावर जमा झाल्याचा कुठलाही संदेश बँकेकडून आला नाही.

संबंधित व्यक्तीने सर्व माहिती घेऊन पाटील यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या उशीराने लक्षात आले. दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून बँकेत याबद्दल लेखी तक्रार केली. बँक व्यवस्थापनाने यापूर्वी अशा सहा तक्रारी दाखल असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. या कालावधीत पाटील यांच्या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने वोडाफोन, जीप कॅश, एअरटेल आणि ऑक्सीकॅश यांच्या नावे १३,०९० रुपयांचे व्यवहार झाले आहे. पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पाटील यांच्या खात्यातून ज्या खात्यात पैसे जमा झाले, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीकडील असल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्या क्रमांकाबाबत कुठली माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ऑनलाईन किंवा डेबीट वा एटीम कार्डच्या चौकशीसाठी येणाऱ्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ग्राहकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात पांढरपेशा गुन्हेगार तरबेज होत आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे असल्याचे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे.

‘दूरध्वनीवर बँक खाते वा एटीएमची माहिती देऊ नये’
एखाद्या दुरध्वनीवरून समोरील व्यक्ती विश्वासू आहे, असे समजून आपण आपला बँक खाते क्रमांक, एटीएम वा ऑनलाईन खात्याचा संकेतांक देणे चुकीचे आहे. उलटपक्षी असा काही फोन आला तर त्याची संपूर्ण शहानिशा संबंधित संस्थेतून करून घ्यावी. जेणेकरून दुरध्वनी करणाऱ्या समोरील व्यक्तीच्या बोलण्यातील सत्यता पडताळता येईल. अनेकदा एटीम केंद्रावर कार्ड वापरता येत नसेल तर मदतीच्या बहाण्याने ते स्विप केले जाते. या परिस्थितीचा विचार करता बँक खाते व एटीएमचा पासवर्ड, इमेल आयडी, बँक खाते क्रमांक कोणालाही देऊ नये
– डॉ. डी. एस. स्वामी (पोलीस उपायुक्त)