जनावरांना पशुखाद्य न देणाऱ्या छावणीच्या देयकातून १० टक्के दंड, तसेच जनावरे जास्त दाखवणे, बॅरिगेटींग व बिल्ले यासह अटींची पूर्तता न करणाऱ्या छावण्यांच्या देयकातून ५ टक्के दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी बजावले आहेत. अशा प्रकारे छावणी चालकांकडून ५२ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने छावणीसम्राटांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्ह्य़ात दुष्काळग्रस्त भागातील ५ तालुक्यांत ६१ छावण्यांच्या दावणीला ९० हजार जनावरे आहेत. नियमानुसार छावण्यांमध्ये जनावरांना पशुखाद्य दिले जाते का, निकषांची अंमलबजावणी होते का? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी    पथक  नियुक्त केले आहे.
पथकाने केलेल्या पाहणीत आठवडय़ातून ३ दिवस पशुखाद्य न देणाऱ्या आष्टी हरिनारायण, पालवण व चिंचोलीनाथ या ३ छावण्यांना ६ लाख २७ हजार ३०८ रुपये दंड आकारण्यात आला. जास्त जनावरे दाखवणे, बॅरिगेटींग न करणे, बिल्ले व टॅक नसणे, अशा आष्टी तालुक्यातील २३ छावण्यांना ५२ लाख ६० हजार १०४ रुपये दंड आकारण्यात आला.
 दंडाची रक्कम छावण्यांच्या देयकातून कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या या कारवाईने छावणीसम्राटांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे.