राज्यात दुष्काळ पडला असताना उपाययोजना करण्यापेक्षा सरकारमधील मंडळी मलाच संपवायच्या योजना आखत आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी राज्याला दिलेली मदत तुटपुंजी आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथे मुंडे यांच्या उपस्थितीत दुष्काळ परिषद झाली. आमदार पाशा पटेल, आर. टी. देशमुख, भाई गंगाभिषण थावरे, संगीता ठोंबरे, बाळासाहेब आजबे आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, राज्यात दुष्काळी स्थिती आहे. जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, मजुरांना काम नाही. मात्र, सरकार दुष्काळ निवारणात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. राज्यासाठी दुष्काळ निवारणास केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने या वर्षीचे संपूर्ण कर्ज व वीजबिल माफ करावे, शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसेच जनावरांना चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना थेट कॅश सबसिडी द्यावी. राज्यात दुष्काळ असताना त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा सरकारमधील काही लोक मलाच संपवायच्या योजना आखत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या वेळी शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.